मुलींच्या ऑनलाइन शिक्षणासाठी मातेनं गहाण ठेवलं सौभाग्याचं लेणं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:46 PM2020-09-28T12:46:40+5:302020-09-28T12:49:46+5:30
एका आईनं विकली कर्णफुले; जुने मोबाईल खरेदी केल्यानंतर सुरू झाला अभ्यास
सोलापूर : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळ्याचं जगणंच बदललं आहे. सर्वात जास्त फटका बसला तो विद्यार्थ्यांना. शाळा बंद असल्याने सर्वांनी ऑनलाइनशिक्षण सुरु केलंय. सोलापुरातील मड्डीवस्ती इथं मुलींच्या शिक्षणासाठी एका आईने चक्क आपलं मंगळसूत्र गहाण ठेवलं तर दुसºया मुलीच्या आईने आपल्या कानातील सोन्याचे फूल विकून जुना स्मार्टफोन खरेदी केला आहे.
मार्च महिन्यात शाळा बंद झाल्या. स्मार्टफोनअभावी मुलांना अभ्यासात अडचणी येत होत्या. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन घोषित केल्यामुळे शाळा ऑनलाइन सुरु झाल्या.
मुलांना ऑनलाइन वर्गाला उपस्थित राहता यावे, यासाठी स्मार्टफोन विकत घेण्यासाठी त्यांच्यावर प्रचंड दबाव होता.
सोलापुरातील मड्डीवस्तीतील दीपाली अलकुंटे आणि जयश्री अलकुंटे या दोघी माऊलीचं हातावरचे पोट असून, त्यांचे पती दगडावर नक्षीकाम करून उखळ, पाटा आणि इतर साहित्य बनवण्याचे काम करतात. दोघींच्या मुली वीरतपस्वी शाळेत इयत्ता सहावीमध्ये शिकत आहेत; मात्र घरात मोबाईल नसल्याने यांच्या दोन्ही मुलींचा अभ्यास काही होत नव्हता.
ना कर्ज, ना मदत..
नवीन मोबाईल खरेदी करण्यासाठी दोन्ही मातांनी बँक, नातेवाईक यांच्याकडे कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला; पण ते मिळाले नाही तसेच कोणी मदतही केली नाही. अखेरीस फक्त तीन हजार रुपयांसाठी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागले. शिवाय आणि कानातील फुले विकावी लागली. त्या पैशातून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी स्मार्टफोन घेतला आहे.