ऑनलाइन उमेदवारी अर्जाची साइट हँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 04:30 AM2020-12-30T04:30:11+5:302020-12-30T04:30:11+5:30
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनिमित्त गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या गावामध्ये गटा-तटाने पार्टीप्रमुख व काही अपक्ष ...
कुर्डूवाडी : माढा तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीनिमित्त गावागावातील राजकीय वातावरण तापले आहे. सध्या गावामध्ये गटा-तटाने पार्टीप्रमुख व काही अपक्ष उमेदवार हे एकमेकांच्या विरोधात अर्ज भरण्यासाठी जवळच्या संगणक केंद्रात गर्दी करीत आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असून, याच काळात संबंधित साइट सतत हँग होण्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळे इच्छुकांनी मुदत वाढवून देण्याची मागणी केली आहे.
काही ठिकाणी उमेदवारी फॉर्मसाठी लागणारी आपली कागदपत्रे जुळवाजुळव करण्यासाठी गर्दी करीत आहेत. यंदा कोरोनामुळे उमेदवारी अर्ज पहिल्यांदा ऑनलाइन भरावा लागत आहे. त्यानंतर तहसील कार्यालयात त्याबाबतची मूळ प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावयाची आहे. मागील दोन दिवसापासून संबंधित साइट वारंवार हँग होत आहे. अशात मागासवर्गीय उमेदवारांना जात पडताळणीच्या टोकनची साइट हँग असल्याने त्यांना दुहेरी फटका बसत आहे. एक दिवसांची मुदत राहिल्याने रात्रीही संगणक कक्षात जाऊन इच्छुक जागत आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या सात दिवसांच्या एकूण मुदतीत तीन दिवस सुट्टी आली. राहिलेल्या चार दिवसांत दोन दिवस साइट हँग झाली. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत ही २३ डिसेंबर ते ३० डिसेंबरपर्यंत आहे. गटा-तटातील वाद मिटल्यांतर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यात शासनाची तीन दिवस सुट्टी आली. राहिलेल्या चार दिवसांत इच्छुकांना अर्ज सादर करायचा आहे. उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी आणखी दोन दिवस मुदत वाढवावी, अशी मागणी अखिल भारतीय सरपंच संघटनेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्ह्याधिकाऱ्यांकडे केली आहे.