अवघे १० साखर कारखाने हिशोबात क्लिअर

By संताजी शिंदे | Published: February 13, 2024 07:07 PM2024-02-13T19:07:22+5:302024-02-13T19:08:27+5:30

जिल्ह्यात यावर्षी ३६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे.

Only 10 sugar mills cleared in accounting in solapur | अवघे १० साखर कारखाने हिशोबात क्लिअर

अवघे १० साखर कारखाने हिशोबात क्लिअर

सोलापूर: जिल्ह्यात २९०० ते ३००० हजार रुपये दर देणाऱ्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे चुकते केले आहेत. मात्र कसाबसा जाहीर केलेला २७०० रुपये दरही अनेक कारखान्यांना परवडेना झाला आहे. त्यामुळेच २६ कारखान्यांकडे एफआरपी प्रमाणे २४६ कोटी रुपये शेतकऱ्यांचे अडकले आहेत.

जिल्हात यावर्षी ३६ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला आहे. यातील औदुंबरआण्णा पाटील (आष्टी शुगर) हा साखर कारखाना २९ जानेवारी रोजी बंद झाला आहे. उर्वरित पैकी १० साखर कारखान्यांनी एफआरपीनुसार १०० टक्के व त्यापेक्षा अधिक रक्कम दिल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील नोंदीवरुन दिसत आहे. उर्वरित २६ साखर कारखान्यांकडे एफआरपी नुसार २४६ कोटी थकल्याने दिसत आहे. जिल्हातील श्री. पांडुरंग पंढरपूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब, सासवड माळीनगर, गोकुळ, ओंकार चांदापुरी, व्ही. पी. शुगर, येडेश्वरी बार्शी व सिताराम महाराज खर्डी या १० कारखान्यांनी १०० टक्के व त्यापेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. 

दर दिलेले साखर कारखाने

० विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब या दोन्ही कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. १५ जानेवारीपर्यंत २७०० रुपये, १६ ते ३१ जानेवारीपर्यंत २७०० +५० रुपये, फेब्रुवारी महिन्यात गाळपाला आलेल्या उसाला २७००+१०० रुपये व मार्च महिन्यात २७००+१५० रुपये दर दिला जाणार आहे. एफआरपी साधारण २९०० रुपये बसेल व उर्वरित २०० रुपये नंतर दिले जाणार असल्याचे चेअरमन आमदार बबनदादा शिंदे यांनी सांगितले. 

० श्री. पांडुरंग साखर कारखान्याने १५ जानेवारीपर्यंत २८०० रुपये, त्यानंतर २८५० रुपये, फेब्रुवारी महिन्यात २९०० रुपये व मार्च महिन्यात ३००० हजार दिले जात आहेत. 

० श्री. विठ्ठल कारखाना पंढरपूरने नोव्हेंबर महिन्यात २८२५ रुपये, डिसेंबर महिन्यात २८५० रुपये, जानेवारी महिन्यात २९०० रुपये फेब्रुवारी महिन्यात २९५० रुपये दिले तर मार्च महिन्यात २९०० रुपये दिले जाणार असल्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी सांगितले. 

० श्री. पांडुरंग श्रीपूर, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर व करकंब या साखर कारखान्यांनी प्रति टन २८०० व २९०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांचे पैसे चुकते केले आहेत. श्री. विठ्ठल पंढरपूर प्रति टनाला २९०० व २९५० दर देत असला तरी २४ कोटी थकले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडील तक्त्यावरुन दिसत आहे.
 

Web Title: Only 10 sugar mills cleared in accounting in solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.