फक्त १३३९ विद्यार्थ्यांनी घेतला मोफत प्रवेश २२ मे पर्यंत मुदतवाढ : प्रवेश घेताना येताहेत अडचणी
By शीतलकुमार कांबळे | Published: May 17, 2023 01:35 PM2023-05-17T13:35:33+5:302023-05-17T13:35:45+5:30
शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत मुलांना मोफत प्रवेश देण्यात येतो.
सोलापूर : शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत मुलांना मोफत प्रवेश देण्यात येतो. या अंतर्गत प्रवेश घेताना आधी सर्व्हरच्या तर आता कागदपत्रांची पूर्तता करण्यास अडचणी येत असल्याने जिल्ह्यात फक्त १३३९ विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळाला आहे.
‘आरटीई’अंतर्गत विद्यार्थ्यांना खासगी शाळेत मोफत प्रवेश देण्यात येतो. ही प्रक्रिया सुरू असून, अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे प्रवेशाची अंतिम मुदत १५ मेपर्यंत वाढविण्यात आली होती. या मुदतीपर्यंतही अनेकांनी प्रवेश घेतला नाही. त्यामुळे आता २२ मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
अनेक विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असून, प्रवेश पडताळणी समितीमार्फत या त्रुटी दूर करण्यासाठी पालकांना मुदत देण्यात आली आहे. अशा पालकांना २२ मे पर्यंत त्रुटी दर करून कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.
यंदाच्या वर्षी ‘आरटीई’साठी सोलापूर जिल्ह्यातून २९५ शाळांनी नोंदणी केली असून, २३२० जागांवर मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. जिल्ह्यातून ७,७३८ पालकांनी आपल्या मुलांसाठी अर्ज सादर केला आहे. त्यापैकी २ हजार १६० मुलांची निवड झाली असून, आतापर्यंत १३३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे.