यंदा केवळ ५६ टक्केच रब्बी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:23 AM2020-12-06T04:23:18+5:302020-12-06T04:23:18+5:30

रब्बी पेरणीसाठी यंदा तालुक्यात सरासरी ८९ हजार ३३० हेक्टर क्षेत्र आरक्षित केले होते. त्यापैकी केवळ ५० हजार ६३२ हेक्टर ...

Only 56% rabi sowing this year | यंदा केवळ ५६ टक्केच रब्बी पेरणी

यंदा केवळ ५६ टक्केच रब्बी पेरणी

Next

रब्बी पेरणीसाठी यंदा तालुक्यात सरासरी ८९ हजार ३३० हेक्टर क्षेत्र आरक्षित केले होते. त्यापैकी केवळ ५० हजार ६३२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच ५६.६८ टक्केच पेरणी झाली आहे. गेल्या अनेक वर्षांत तालुक्यात पहिल्यांदाच असा प्रकार घडला आहे. रब्बी हंगामात पेरणी वेळेवर सुरू होत असे यंदा परतीच्या पावसाने तालुक्यात धुमाकूळ घातला. यामुळे अतिवृष्टी व बोरी, हरणा, भीमा, सीना या चारही नद्यांना महापूर आला. यामुळे रब्बी पेरणीला उशीर झाला आहे.

यंदा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे रब्बी पेरणीला फटका बसला आहे. इतर पिकाची कमी क्षेत्रावर पेरणी झाली असलीतरी हरभरा पेरणी दुप्पट वाढली आहे. तसेच उसाचे क्षेत्र वाढत आहे.

---

पीकनिहाय झालेली पेरणी अशी

रब्बी हंगामात पहिल्या पसंतीचे पीक असलेल्या ज्वारीसाठी ६६ हजार ८० हेक्टर क्षेत्र आरक्षित असताना केवळ २७ हजार ३२१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मका- १ हजार ३९५ हेक्टर क्षेत्र असून ५७४ हेक्टरवर पेरणी, गहू ४ हजार ५७५ हेक्टर आरक्षित असताना ६ हजार ६४ हेक्टर पेरणी झाली आहे. तर हरभरा ८ हजार ४८० हेक्टर आरक्षित असताना तब्बल १६ हजार ४७७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. या प्रमुख पिकासह सूर्यफूल, करडई, तीळ, जवस, अशा विविध प्रकारच्या रब्बी पिकासाठी तालुक्यात ८९ हजार ३३० हेक्टर क्षेत्र आरक्षित होते. त्यावर केवळ ५० हजार ६३२ हेक्टर म्हणजेच ५६. ६८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

----

तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक प्रमाणात पाऊस झाला आहे. ज्वारीची पेरणी कमी झाली तरी गहू, हरभरा, उसाचे क्षेत्र वाढत आहे. काही ठिकाणी जमीन महापुरात खरडून गेल्यामुळे रब्बी पेरणीचे क्षेत्र घटले आहे.

- सूर्यकांत वडखेलकर, तालुका कृषी अधिकारी

--

Web Title: Only 56% rabi sowing this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.