दीड महिन्यात केवळ ८४० दस्तनोंदणी; २५ लाख रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:27 AM2021-09-05T04:27:18+5:302021-09-05T04:27:18+5:30
राज्य शासनाने १२ जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे गुंठेवारीची दस्त नोंदणी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे तहसील ...
राज्य शासनाने १२ जुलैपासून राज्यात तुकडेबंदी कायदा लागू केला आहे. त्यामुळे गुंठेवारीची दस्त नोंदणी बंद झाली आहे. त्याचप्रमाणे तहसील कार्यालयातून केलेल्या लेआऊटला जर नगर रचना विभागाची मान्यता नसेल तर अशा ठिकाणचेसुद्धा दस्तऐवज नोंदणीसाठी येत नाहीत. त्यामुळे मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी अत्यंत संथगतीने सुरू आहे.
हा आदेश लागू होण्यापूर्वी मंगळवेढा दुय्यम निबंधक कार्यालयात १ जून ते १५ जुलै या दीड महिन्यात ८९० दस्त नोंदणी झाल्या होत्या. यामधून १ कोटी ३० लाख २४ हजार रुपये, तर जुलै १६ ते ३१ ऑगस्टपर्यंत ८४० दस्तनोंदणीतून १ कोटी ५ लाख रुपये महसूल जमा झाला होता. मात्र, या दस्त नोंदणीत डीसीसी बँकेचे गहाणखत व उजनी कॅनॉल जमीन संपादितचे जवळपास २३० दस्त असून, यातून २२ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यामुळे डीसीसी व उजनी कॅनॉलचे दस्त व त्यातून मिळालेला महसूल वगळता गुंठेवारी बंदी कायद्याचा एकूण महसुलावर मोठा परिणाम जाणवत आहे. यापूर्वी १ लाख रुपयांच्या कर्जाला डीसीसी बँक गहाणखत घेत नव्हते. मात्र, सध्या गहाणखत घेण्याची संख्या वाढली आहे.
यांना झाला पश्चात्ताप
मंगळवेढा शहरात प्लॉटच्या ले-आऊटला तहसीलदारांची ४२ ब ची परवानगी घेऊन बहुतांशी प्लॉट विक्री केले. मात्र, आता शिल्लक राहिलेल्या प्लॉटची विक्री कशी करावी याबाबत विक्रीदार व खरेदीदार यांचा मनस्ताप वाढला आहे.
----
असा आहे गुंठेवारी बंदीचा आदेश
जमिनीचे भाव प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने जमिनीचे तुकडे मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे धारण जमिनीचे तुकडे पाडण्यासाठी प्रतिबंध केला असून, कलम ८ ब नुसार सुधारणा केली आहे. यामध्ये बागायती शेती ही एक एकर त्याच गटातील शेतकरी घेऊ किंवा विक्री करू शकतो.
मात्र, २ एकर क्षेत्र घेण्यासाठी कोणताही शेतकरी पात्र होऊ शकतो, तर कोरडवाहू शेतीला २ एकरची मर्यादा दिली आहे. याशिवाय तहसीलदारांनी दिलेले ले आऊटचे परवाने आता संपुष्टात आले आहेत. आता गुंठेवारी ले आऊटला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. शासन निर्णय आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक मुंबई यांच्या निर्देशानुसार कामकाज सुरू आहे, अशी माहिती दुय्यम निबंधक शंकरराव सांगळे यांनी दिली.
-----
१२ जुलैपासून तुकडेबंदी कायदा लागू झाला आहे. त्यामुळे गुंठेवारी दस्त नोंदणी बंद झाली आहे. दिवसभरात जी दस्त नोंदणी होते त्यामध्ये गहाणखताची नोंदणी जास्त आहे. सध्या पीक कर्ज, उजनी कॅनॉल व इतर कर्जासाठी गहाणखत मोठ्या प्रमाणात होत आहे. मात्र, इतर दस्त नोंदणी मंदावली आहे.
- शंकरराव सांगळे, दुय्यम निबंधक मंगळवेढा
-----
मंगळवेढा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात शुकशुकाट असल्याचे छायाचित्रात दिसत आहे.