साडेतीन हजार लोकांमागे केवळ एकाच पोलिसाचा बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:41 AM2021-02-21T04:41:48+5:302021-02-21T04:41:48+5:30
सध्या सांगोला तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत ३ हजार ५०० लोकांमागे एकच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी येत आहे. अशातच गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीचा ...
सध्या सांगोला तालुक्यात लोकसंख्येच्या तुलनेत ३ हजार ५०० लोकांमागे एकच पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी येत आहे. अशातच गृहमंत्र्यांनी पोलीस भरतीचा नुकताच निर्णय घेतल्याने तालुक्यातील पोलिसांची संख्या वाढून पोलिसांवरील कामाचा ताण कमी मदत होणार आहे. २०११ च्या जनगणनेनुसार सांगोला शहराची लोकसंख्या ३४ हजार ३२१ तर ग्रामीण भागाची लोकसंख्या २ लाख ८८ हजार ५२४ अशी एकूण तालुक्याची लोकसंख्या ३ लाख २२ हजार ८४५ इतकी आहे. आता त्यात ५० हजारांनी वाढ झाली असल्याचे सांगण्यात येते.
सांगोला तालुक्यासाठी एकच पोलीस स्टेशन असून १ पोलीस निरीक्षक, ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, २ पोलीस उपनिरीक्षक, ७६ पोलीस कर्मचारी, ६ महिला पोलीस कर्मचारी अशी एकूण ८९ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या आहे. त्यातही काही सुट्टीवर, काहीजण उच्च न्यायालयात तर काहींना पोलीस मुख्यालयात कामासाठी जावे लागते. त्यामुळे अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना जबाबदारी पार पाडावी लागत आहे. सद्यस्थितीत सांगोला तालुक्याच्या लोकसंख्येच्या मानाने ३ हजार ६२७ लोकांमागे १ पोलीस कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या संख्येमुळे जास्तीचे तास काम करून आपले कर्तव्य पार पाडावे लागत आहे.
गुन्हेगारीवर आळा घालताना होतेय दमछाक
अशातच व्हीआयपी बंदोबस्त, निवडणुका, मोर्चे, आंदोलने, जयंती मिरवणूक, उपोषणे यांचा बंदोबस्त सांभाळून गुन्ह्याची उकल करावी लागत आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नैसर्गिक आपत्ती व तत्सम कालावधीत पोलिसांवर ताण येतो. गेल्या वर्षभरात कोरोना संसर्गातही पोलिसांवर ताण वाढला आहे. घरफोडी, चोऱ्या, खून, मारामारी, बलात्कार, सरकारी नोकरांवर हल्ले, वाहनचोरी, विनयभंग, सरकारी कामात अडथळा अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. नियमित कामाव्यतिरिक्त इतर बंदोबस्ताची कामे सांभाळून गुन्हेगारीला आळा घालताना पोलिस आधिकारी, कर्मचाऱ्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.
कोट ::::::::::::::
पोलीस दलात अधिक सुसूत्रता येण्यासाठी आणखी एका पोलीस ठाण्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुलनेने कमी मनुष्यबळ असले तरी जबाबदारी निश्चित करून गुणात्मक काम करण्यास प्राधान्य दिले जाईल.
- भगवान निंबाळकर
पोलीस निरीक्षक