ग्रामीण रोजगार हमी योजनेत फक्त अडीच हजार मजुरांच्या हाताला काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 01:15 PM2020-12-17T13:15:46+5:302020-12-17T13:15:54+5:30
सोलापूर जिल्हा : मजुरी कमी असल्याने कामांकडे मजुरांची पाठ
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : मागील काही वर्षांत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेला ग्रामीण भागातील मजुरांकडून प्रतिसाद मिळेना. दिवसेंदिवस कामांची संख्या आणि मजुरांची संख्या यात घट होत आहे. सध्या प्रतिदिन २३८ रुपये मजुरी आहे.
प्रतिवर्षी दोन ते पाच रुपयांची मजुरीवाढ मिळते. खासगी ठेकेदारांकडून प्रतिदिन पाचशे ते हजार रुपये मजुरी मिळत असल्याने ग्रामीण भागातील मजूर शहराकडे वळत आहेत. मजुरी चांगली मिळत असल्याने खासगी बांधकामांकडे मजुरांचा ओढा अधिक आहे.
सोलापूर जिल्ह्यात सध्या ४१९ कामे सुरू आहेत. यात २६५९ मजूर कार्यरत आहेत. एकेकाळी लाखो मजूर या योजनेंतर्गत काम करायचे. आता ही संख्या बोटांवर मोजण्याइतकी आहे. डिसेंबर २०१९ दरम्यान सोलापूर जिल्ह्यात ५५४ कामे सुरू होती.
त्यावेळी ३१०९ मजूर कार्यरत होते. एप्रिल २०१९ ला फक्त ३६८ कामे सुरू होती. त्यावेळी २२७३ मजूर कार्यरत होते. ऑक्टोबर २०१९ ला १४९ कामे सुरू होती. त्या वेळेस ७३३ मजूर कार्यरत होते.
रोजगाराची साधने वाढली..
केंद्र सरकारकडून ही योजना राबविली जाते. या योजनेचा देशभरात बोलबाला होता. ग्रामीण भागातील बेरोजगारांना वर्षातील शंभर दिवस हमखास काम, या योजनेंतर्गत मिळते. पूर्वी रोजगाराची साधने कमी होती, त्यामुळे या योजनेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळायचा. आता रोजगाराची साधने वाढली आहेत. लोक शहराकडे मजुरीसाठी येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील रोजगार हमी योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळतोय.
आता माझे वय पंचेचाळीस आहे. सात-आठ वर्षांपूर्वी रोजगार हमी योजनेवर कामाला जायचो. त्यावेळी ती मजुरी परवडायची. आता महागाई वाढली आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत फक्त २३८ रुपये मिळतात. या तुलनेत शहरातील खासगी बांधकाम ठेकेदाराकडे आठशे रुपये मजुरी मिळते. त्यामुळे मी आणि माझे अनेक सहकारी रोजगार हमी योजनांच्या कामांवर जात नाही.
- रामदास मोरे, मोहोळ तालुका