दहा दिवसात केवळ दोन मृत्यू, तरीही सोलापुरातील बाजारपेठेत स्मशानशांतता का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 11:48 AM2021-07-09T11:48:05+5:302021-07-09T11:48:16+5:30

व्यापाऱ्यांचा सवाल: झालेले मृत्यू तांत्रिक असताना कडक नियमावलीचा अंमल

Only two deaths in ten days, yet why the silence in the market in Solapur? | दहा दिवसात केवळ दोन मृत्यू, तरीही सोलापुरातील बाजारपेठेत स्मशानशांतता का ?

दहा दिवसात केवळ दोन मृत्यू, तरीही सोलापुरातील बाजारपेठेत स्मशानशांतता का ?

Next

सोलापूर : सोलापूर शहरात गेल्या दहा दिवसात अवघे १०८ पॉझिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्यांमध्ये एक आजारी वृद्ध, तर दुसरा पाण्यात बुडून मरण पावलेला असतानाही दुपारी चारनंतर बाजारपेठेत स्मशानशांतता पसरत आहे. कोरोनाचे प्रमाण घटलेले असताना असा कडक नियम का, असा सवाल व्यापारी अन्‌ नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

सोलापूर शहरात कोरोनाचा संसर्ग घटला आहे. २८ मेपासून आढावा घेतल्यास संसर्गाचे प्रमाण घटल्याचे दिसून येते. सोलापुरात २८ मे ते ३ जून या आठवड्यात १२ हजार ५५७ चाचण्यात अवघे १६० जण बाधित आढळले, तर १८ जणांचा मृत्यू झाला. बाधितांचे प्रमाण १.२, तर मृत्यूचे प्रमाण ११.३ टक्के राहिले. त्यानंतर ४ मे ते १० जूनची तुलना केल्यास १९ हजार ८०६ चाचण्यांमध्ये १४७ जण पॉझिटिव्ह आले, तर केवळ ८ जणांचा मृत्यू झाला. ११ मे ते १७ जून या कालावधीत १६ हजार ६२७ चाचण्या झाल्या. यात केवळ ८४ जण बाधित, तर १२ जणांचा मृत्यू झाला आहे. १८ मे ते २४ जूनच्या चाचण्यांची तुलना केल्यास ७ हजार ४०२ चाचण्यांमध्ये केवळ ५० बाधित आढळले, तर केवळ ६ जणांचा मृत्यू झाला.

२५ जून ते १ जुलै या दरम्यान ७ हजार १४५ चाचण्या झाल्या. यात केवळ ५५ बाधित आढळले, तर ३ जणांचा मृत्यू झाला. २ ते ६ जुलै दरम्यान ६ हजार ७४६ चाचण्या झाल्या. यात ६४ बाधित, तर केवळ एकाचा मृत्यू झाला आहे. जुलै महिन्याच्या सात दिवसांचा विचार केल्यास ८४ जण बाधित, तर दोघांचा मृत्यू झाला आहे. पाण्यात बुडून मरण पावलेला एक तरुण पॉझिटिव्ह निघाला, तर दुसरा वृद्ध आजारी होता. सोलापूर शहरातील कोरोना संसर्गाची ही स्थिती असताना नियमांची कडक अंमलबजावणी का, असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

या भीतीतून झाला बदल

डेल्टा प्लस संसर्गाच्या भीतीने शहरात लागू असलेला दुसरा स्तर रद्द करण्यात आला. त्यामुळे बाजारपेठा दुपारी चारनंतर बंद होऊ लागल्या. पण, वास्तविक शहराचा संसर्ग कमी होत असताना ही भीती कशाला, असा सवाल व्यापाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

लसीकरण तरी वाढवा

एकीकडे भीतीने बाजारपेठ बंद करण्यात आली तर दुसरीकडे कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेले लसीकरण मागे पडत आहे. नागरिक पहाटेपासून लसीकरणासाठी रांगेत थांबत असताना लसीचा तुटवडा जाणवत आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यासाठी ३० हजार लस आली. शहराच्या वाटणीला आलेली ८ हजार लस एकाच दिवसात संपली. गेले दोन दिवस शहरात लसीकरण बंद आहे.

Web Title: Only two deaths in ten days, yet why the silence in the market in Solapur?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.