पायी वारीसाठी फक्त दोन वारकऱ्यांना परवानगी, पंढरपुरात १७ ते २५ जुलैदरम्यान संचारबंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 07:44 AM2021-07-06T07:44:27+5:302021-07-06T07:45:34+5:30
शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे.
सोलापूर: आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला बसने येणाऱ्या दहा पालख्यांसोबत ४०० वारकऱ्यांना येण्याची आणि वाखरीपासून प्रतिकात्मक पायी वारी करण्यास परवानगी दिली असली, तरी प्रत्यक्ष पायी वारी करण्यास प्रत्येकी दोन म्हणजे केवळ २० वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, १७ ते २५ जुलैदरम्यान पंढरपूर शहरासह या परिसरातील नऊ गावांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. (Only two Warakaris allowed for wari, curfew in Pandharpur from 17th to 25th July)
शनिवारी १७ जुलैला दुपारी दोन वाजल्यापासून ते रविवार २५ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहणार आहे. पंढरपूर शहरासह या परिसरातील भटुंबरे, चिंचोली भोसे, शेगाव दुमाला, लक्ष्मी टाकळी, गोपाळपूर, वाखरी, कोर्टी, गादेगाव, शिरढोण, कौठाळी, आदी गावांमध्ये संपूर्ण संचारबंदी राहणार असून, अत्यावश्यक सेवांना मात्र यातून वगळण्यात आले आहे.
सर्व मानाच्या १० पालख्या १९ जुलैला वाखरी येथे दुपारी तीनपर्यंत दाखल होणार आहेत. त्यानंतर वाखरी ते इसबावी येथील विसावा मंदिर हे तीन किलोमीटरचे अंतर पायी चालण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र दहा पालख्यांमधून प्रत्येकी दोन याप्रमाणे केवळ २० वारकऱ्यांनाच पायी वारी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर वारकऱ्यांना मात्र बसमधूनच पंढरपूरमधील आपापल्या मठाच्या ठिकाणी रवाना व्हावे लागणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय पूजा
११ ते २८ जुलैदरम्यान पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंदच राहील. दहा पालख्या २४ जुलैला पंढरपूरहून परतीला निघतील. २० जुलैला आषाढी एकादशी असून, यादिवशी पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मानाच्या वारकऱ्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रखुमाईची पूजा होणार आहे.