सोलापूर जिल्ह्यातील हिरजचे ‘रेशीम पार्क’ उभारणीचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 12:49 PM2018-07-28T12:49:54+5:302018-07-28T12:53:08+5:30
निधीला मिळाली मंजुरी: साडेसहा कोटी रुपये खर्चून कोष बाजारपेठची उभारणी
अरूण बारसकर
सोलापूर : हिरज येथे रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगण्यात आले. जालन्यानंतर सोलापुरात रेशीम पार्क अंतर्गत कोष बाजारपेठ उभारली जाणार आहे.
मागील तीन-चार वर्षांत पश्चिम महाराष्टÑातील सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्यातही तुतीचे क्षेत्र वाढत आहे. याशिवाय शेजारच्या कर्नाटक राज्यातही शेतकरी रेशीम उत्पादन घेत असल्याने कोषची बाजारपेठ तयार होण्यासाठी हिरज येथे रेशीम पार्क उभारणीसाठी १० एकर जमीन जिल्हाधिकाºयांनी जिल्हा रेशीम विकास अधिकाºयांना हस्तांतरित केली आहे.
या जमिनीवर रेशीम पार्कची उभारणी करण्यात येणार असून, यासाठी नागपूर रेशीम संचालनालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव गेला होता. रेशीम पार्कसाठी इमारत व अन्य सुविधांसाठी ६ कोटी ५४ लाख रुपयांचे अंदाजपत्रक शासनाकडे पाठविले होते. त्याला नुकतीच राज्याच्या कृषी खात्याने मंजुरी दिली असल्याने आता पुढील कामे लवकरच सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले.
मराठवाड्यातील जालना येथे मागील वर्षी रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी १९ लाख रुपये मंजूर झाले असून, त्यातून कामे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील हिरज येथे उभारले जाणारे रेशीम पार्क हे राज्यातील व लगतच्या कर्नाटकातील शेतकºयांसाठी दुसरी कोष बाजारपेठ होणार असल्याचे सांगण्यात आले.
१० हजार शेतकºयांना फायदा
- हिरज येथील रेशीम पार्क कोष बाजारपेठेचा किमान १० हजार शेतकºयांना फायदा होईल असे सांगण्यात आले. कमी पाण्यावर चांगला पैसा मिळवून देणारे व वर्षभर उत्पादन घेता येणारे पीक म्हणून तुतीचा उल्लेख मराठवाड्यात केला जातो, असे उपसंचालक(रेशीम) अर्जुन गोरे म्हणाले. शेजारच्या उस्मानाबाद, पुणे व कर्नाटकातील काही जिल्हे तसेच सोलापूर जिल्ह्यातील १० हजार शेतकरी हिरजच्या रेशीम पार्कशी जोडले जातील, असेही गोरे म्हणाले.
यातून ही होतील कामे
- या निधीतून शिवाय आवश्यकता भासल्यास जिल्हा नियोजनमधून निधीची मागणी करुन आवश्यक ती संपूर्ण कामे केली जाणार असल्याचे नागपूर येथील उपसंचालक(रेशीम) अर्जुन गोरे यांनी सांगितले. जमीन सपाटीकरण, संरक्षण भिंत, वीज, पाणी, शेतकºयांसाठी प्रशिक्षण हॉल, कार्यालयासाठी इमारत व अन्य सुविधांसाठी हा निधी वापरला जाणार आहे.
हिरज येथील कोष खरेदी-विक्री बाजारपेठ उभारणीचे काम वर्षभरात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोलापूरच्या शेतकºयांना याचा मोठा फायदा होणार असल्याने तुतीच्या लागवडीचे क्षेत्रही जिल्ह्यात वाढत आहे.
- अर्जुन गोरे,
उपसंचालक(रेशीम) नागपूर