ऑपरेशन परिवर्तन ठरतेय प्रभावी; दारू विक्रेत्याचा झाला किराणा दुकानदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:28 AM2021-09-16T04:28:15+5:302021-09-16T04:28:15+5:30
कामती पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २८ गावे येतात. ऑपरेशन परिवर्तनसाठी प्रत्येक गावाला एक पोलीस असे अठ्ठावीस गावांना २८ पोलीस कर्मचाऱ्यांची ...
कामती पोलीस ठाण्यांतर्गत एकूण २८ गावे येतात. ऑपरेशन परिवर्तनसाठी प्रत्येक गावाला एक पोलीस असे अठ्ठावीस गावांना २८ पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत अवैध दारू विक्रेत्याचे मनपरिवर्तन करून त्यांना योग्य प्रवाहात आणायचा हेतू आहे. यालाच अनुसरून कामती पोलीस ठाण्यांमध्ये या मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे.
याचाच एक भाग म्हणून पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी कामती खुर्द लमाणतांडा येथील अवैध दारू विक्रेते सिद्राम राठोड यांचे मनपरिवर्तन करून त्यांना किराणा दुकान टाकण्याचा सल्ला दिला आहे. राठाेड हे गेल्या २५ वर्षापासून दारू विक्रीचा व्यवसाय करीत होते. कामती पोलीस ठाण्यात त्यांच्या विरुद्ध एकूण बारा दारूबंदी अधिनिमांतर्गत गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी केलेल्या समुपदेशनानंतर राठोड यांनी दारू विक्री करून दुसऱ्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याऐवजी स्वत:च बदलण्याचा निर्णय घेतला आणि गावातच मोठे किराणा दुकान सुरू केले.
...............
ऑपरेशन परिवर्तनअंतर्गत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्रेते सहकार्य करीत आहेत. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे. लोकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
अंकुश माने, सहा पोलीस निरीक्षक कामती पोलीस ठाणे
...............
आजपर्यंत चोरूनलपून दारूचा व्यवसाय केला. समाजात उंच मानेने जगता येत नव्हते. कायम पोलीस ठाणे आणि न्यायालयात जावे लागायचे. कामती पोलिसांनी समुपदेशन करून माझ्यात बदल घडवून आणण्याचे काम केले आहे. सध्या मी ताठ मानेने जगतो आहे. मी दारू व्यवसाय बंद करून किराणा दुकान सुरू केले आहे.
सिद्राम राठोड, लमाणतांडा, कामती खुर्द
.......
फोटो : दारु विक्रींचा धंदा सोडून किराणा दुकान सुरु केलेले कामती खुर्द येथील सिद्राम राठोड.
..........
(१५कामती)