आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र; गरिबीमुळे कामाला गेलेल्या ३५५ बालकांची झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 11:29 AM2019-01-04T11:29:09+5:302019-01-04T11:47:18+5:30
सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेली आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेंतर्गत ३५५ बालकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित पालकांच्या ताब्यात ...
सोलापूर : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेली आॅपरेशन मुस्कान महाराष्ट्र मोहिमेंतर्गत ३५५ बालकांचा शोध घेऊन त्यांना संबंधित पालकांच्या ताब्यात देण्यात आले. यामध्ये दोन अपहरण करण्यात आलेली पीडित मुले व तीन हरवलेल्या बालकांचा समावेश आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.
मोहिमेंतर्गत शहरातील हरवलेली, बेवारस, बालमजूर, कचरा गोळा करणारे, भिक्षा मागणारे तसेच रेकॉर्डवरील बालकांचा शोध घेण्यात आला. १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २0१८ दरम्यान ही मोहीम घेण्यात आली. शहरातील सात पोलीस ठाण्याकडील प्रत्येकी १ महिला अधिकारी व ३ महिला कर्मचारी, महिला कक्षाकडील ७ महिला कर्मचारी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील २ महिला कर्मचारी असे सर्व मिळून ७ महिला पोलीस अधिकारी व २९ महिला पोलीस कर्मचारी नेमण्यात आले होते. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत बालकल्याण मंडळ, चाईल्ड लाईन, रेल्वे चाईल्ड लाईन व विधायक भारती संस्था, मुंबई आणि बालकामगार अधिकारी सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत गस्त घालत होते.
१८ वर्षांखालील मुलांना ताब्यात घेऊन त्यांना जिल्हा महिला व बालविकास विभागासमोर उभे केले जात होते. बालकांच्या पालकांची खातरजमा करून त्यांना त्यांच्या स्वगृही पाठवण्यात आले. मुलांना शिक्षणाचे महत्त्व सांगून प्रोत्साहन देण्यात आले. पिटा अॅक्ट अंतर्गत एक कारवाई करण्यात आली असून त्यात पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे. गेल्यावर्षी आॅपरेशन मुस्कान अंतर्गत १६८ मुलांची सुटका करण्यात आली होती. यंदा ३५५ मुलांना स्वगृही पाठवण्यात आले आहे. ही मोहीम पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त अभय डोंगरे, पोलीस निरीक्षक दुपारगुडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षा कांबळे यांनी पार पाडली.
काम करणे ही बालकांची मजबुरी
- सोलापुरात हॉटेल, कापडाची दुकाने, लॉज आदी ठिकाणी बालकामगार मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. जे वय हसण्या-बागडण्याचे, शिक्षण घेण्याचे आहे; त्या वयात मुले कामाला जाऊन घरप्रपंचाला हातभार लावतात. मात्र कायद्याने हा गुन्हा आहे. मुलांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्टÑ शासनाच्या वतीने ‘आॅपरेशन मुस्कान’ ही मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्रास गरीब घरातील मुले आढळून आली. त्यामुळे काम करणे ही त्यांची मजबुरी होती.