कोरोनानंतर देशांतर्गत पर्यटनाला संधी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 03:38 PM2020-05-29T15:38:40+5:302020-05-29T15:39:06+5:30
कोरोनाची भीती जाताच लोकांनी पर्यटनासाठी भारतातच पसंती दिल्यास आपल्याच देशाच्या संस्कृतीचा आनंद घेत कोरोनामुळे मनावर आलेलं हे दडपण दूर होण्यास मदतच होईल.
सन्माननीय अन् मित्रहो कोरोना विषाणूमुळं अवघं जग धास्तावलंय. अनेक जण मृत्यूशी झुंजताहेत. दोनशेहून अधिक देशात कोरोनानं उच्छाद मांडलाय. अनेकांना त्यानं मृत्यूच्या जाळ्यात ओढलंय आणि ओढतोय. यात आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात भेडसावू लागलं आहे. त्यात मजुरांचे स्थलांतर, बाजारपेठही बंद आहे, कच्चामाल मिळत नाही, वाहतूक सेवा बंद आहेत. देश, राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा बंद असल्याने अनेक उद्योगधंदे डबघाईला आले आहेत. यातून पर्यटन क्षेत्रही सुटलेलं नाही. करोडो रुपयांचे नुकसान सहन करणाºया पर्यटन क्षेत्रासाठी भविष्यात जीवनदायी ठरेल ते म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव व भीती कमी झाल्यावर देशांतर्गत पर्यटनाला सुवर्णसंधी येऊ शकते. सर्वच देशात कोरोनाचे प्रमाण अधिक आहे. भारतात याचे प्रमाण कमी असल्याने देशांतर्गत पर्यटनाला सुगीचे दिवस येतील, असे वाटते. सध्याच्या स्थितीमध्ये सर्व जग या विषाणूमुळे थांबले आहे. अशा परिस्थितीत मनातील भीती परदेशी जाऊ नये हेच मनात घोंगावत आहे. पर्यटक सर्व जग फिरतात, परंतु आज याला ब्रेक लागला आहे. परंतु कोरोनाची भीती जाताच लोकांनी पर्यटनासाठी भारतातच पसंती दिल्यास आपल्याच देशाच्या संस्कृतीचा आनंद घेत कोरोनामुळे मनावर आलेलं हे दडपण दूर होण्यास मदतच होईल, असं वाटतं. अर्थात पूर्वीपेक्षा अधिक दक्षता घेत हे करावं लागणार हे मात्र निश्चित.
भारतीय संस्कृती नेहमीच ‘अतिथी देवो भव’ या तत्त्वावर अनेक लोकांना सेवा देते. हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय आज जरी बंद असला तरी पुढे नक्कीच पर्यटनामुळे चांगले दिवस असणार आहेत. पर्यटनाला भारत देशातील संस्कृती अनुभवाला मिळेल. कामगारांचे स्थलांतर होत असताना या पर्यटन क्षेत्रात मोठी किंमत चुकवावी लागत असताना व्यवस्थापनाकडे कामगार मिळावे हे सुद्धा सोपे होईल. प्रत्येकाला काम करावे लागेल. घरचा रथ ओढण्यासाठी प्रत्येक भारतीयाला काम करावे लागेल. अशा परिस्थितीत रोजगार निर्मितीही पर्यटनक्षेत्र करून देईल व मोठ्या प्रमाणात लोक हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये काम करतील.
टूर अँड ट्रॅव्हल सेवा देणारी कंपनी भारतात जास्त टूर करतील, जेणेकरून स्थानिक पातळीवर सर्व क्षेत्र व त्यावर अवलंबून असणारे उद्योग यांना चालना मिळेल. पर्यटक स्थानिक ठिकाणी राहणे, जेवणे किंवा स्थानिकांकडून खरेदी करणे हे करताना दिसून येतील. त्यामुळे नक्कीच देशाचे, राज्याचे व स्थानिक क्षेत्राचे विकास होणे शक्य आहे, असे वाटते.
आज मनात भीती तर आहेच; पण काही पर्यटक आपल्या पसंतीच्या जागी जसे पर्वतरांगा, नदी, समुद्र, किनारपट्टी, जंगल, थंड हवेची ठिकाणे, तलावांचा अनुभव घेण्यासाठी सदैव उत्सुक असतात आणि आपल्या देशात याची कमतरता नाही. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय संस्कृती बघण्यासाठी नक्कीच पर्यटक भ्रमंती करतील.
आर्थिक स्तरावर जर पर्यटक देशांतर्गत पर्यटन करतील तर भारतातील चलन हे देशातच राहील. विदेशात जाऊन खर्च करताना विदेशाला आपण समृद्ध करतो, परंतु भारतात खर्च झालेला पैसा नक्कीच आर्थिक दुर्बलता कमी करेल. भारतात हे चलन फिरण्यास मदत होईल, असं वाटतं.
काळ खराब असला तरी पर्यटन क्षेत्रासमोर त्यातून बाहेर पडण्याची ताकद नक्कीच आहे. हे सर्वतोपरी प्रयत्न आणि संकटातून मार्ग काढण्याची ताकद माणसात आहे. भारतीय लोक संकटातून मार्ग काढण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. केंद्र व राज्य सरकारने काही नियम व अटी शिथिल करून हॉटेल, रेस्टॉरंट व टूर अँड ट्रॅव्हल कंपन्यांना सहकार्य करावे. विमानसेवा, रेल्वे आणि बससेवा सुरळीत करत सर्वांना पर्यटन स्थळांशी जोडावे. रस्ते नीट करून जास्तीत जास्त स्थळांना जोडावे, जेणेकरून दळणवळण सोपे होईल .
केंद्र व राज्य सरकारकडून करसवलती द्याव्यात. जेणेकरून ग्राहक व मालकांचाही फायदा होईल. चलन फिरावे, सरकारने सुरक्षा व सुविधा यावर लक्ष दिल्यास पर्यटक नक्कीच भारतात पर्यटन करतील आणि या सर्वांचा सुवर्णकाळ परत येण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले तर पुन्हा चांगले पर्यटन घडेल, हे नक्की.
- ऋत्विज चव्हाण
(लेखक सामाजिक व कला क्षेत्रात कार्यरत आहेत.)