कुलगुरूंच्या मनमानी कारभाराविरोधात निदर्शने
By admin | Published: July 18, 2014 01:39 AM2014-07-18T01:39:13+5:302014-07-18T01:39:13+5:30
सुटा संघटना : प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
सोलापूर : कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या मनमानी व बेकायदेशीर कामकाजाच्या विरोधात विद्यापीठातील प्रशासकीय कार्यालयासमोर सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघटना (सुटा) च्या वतीने निदर्शने करण्यात आली. निवेदन स्वीकारण्यास कुलगुरू न आल्याने संघटनेने ठिय्या आंदोलन केले.
यावेळी सुटा संघटनेने पुढील मागण्या केल्या आहेत. शिक्षक स्थान निश्चितीचे कामकाज विद्यापीठामार्फत पूर्वीप्रमाणे केंद्रीय पद्धतीने व्हावे, ग्रंथपाल/शारीरिक शिक्षण संचालकाचे ए.पी.आय.प्रोफार्मा लवकर मंजूर करून घेणे, संशोधक मार्गदर्शकाचे वय ६५ होईपर्यंत संशोधक विद्यार्थी देणे, डी.आर.सी.मध्ये पीएच.डी. असलेल्यांनाच नेमणे, नेट/सेट मुक्त प्राध्यापकांची (आॅक्टोबर १९९२ पर्यंत) स्थाननिश्चिती करणे व मान्यता ताबडतोब देणे, शिवाजी/ पुणे विद्यापीठाप्रमाणे बी.बी.ए. व बी.सी.ए. या अभ्यासक्रमास विद्यार्थी मिळविण्यासाठी महाविद्यालय स्तरावर प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश देण्यास परवानगी द्यावी, सेवानिवृत्त झालेल्या डॉ. एस.व्ही. लोणीकर यांची प्रभारी परीक्षा नियंत्रकपदी झालेली नेमणूक ताबडतोब रद्द करावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षा वेळेवर घेणे व निकालसुद्धा वेळेत लावणे, महाविद्यालयातील प्राध्यापक पदाची प्रक्रिया ताबडतोब पूर्ण करावी, अकौंटन्सी अस्थायी अभ्यास मंडळावर प्रमाद समितीने दंड केलेल्या सदस्यांची व ग्रंथालय अस्थायी अभ्यास मंडळावर निवृत्त झालेल्या शिक्षकांची नेमणूक रद्द करावी, सी.आय.ई. पद्धत पूर्ण तयारीने व कायदेशीरपणे अंमलात आणावी.
यावेळी सुटा संघटनेचे अध्यक्ष प्रा. डॉ. हनुमंतराव आवताडे, प्रा. देवेंद्र मदने, प्रा. तानाजी मगर, प्रा. डॉ. तानाजी फुलारी, प्रा. डॉ. तुकाराम शिंदे, प्रा. डॉ. फैतिमा विजापुरे, प्रा. जाकीर मुलाणी, प्रा. अशोक कदम, प्रा. भारत जाधव, प्रा. एस.के.मठपती, प्रा. एच.के.कामठे, प्रा. अॅनी जॉन, तानाजी कोळेकर, महादेव देशमुख आदी सुटा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.
--------------------------
कुलगुरुंनाच दिले मागण्यांचे निवेदन...
सुटा संघटनेने केलेल्या आंदोलनाच्या ठिकाणी बी.सी.यू.डी.चे संचालक डॉ. भांजे हे आले असता त्यांना निवेदन देण्यात आले नाही. कुलगुरू स्वत: याठिकाणी आले पाहिजे, अशी भूमिका घेत प्राध्यापकांनी ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर काही वेळाने स्वत: कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार हे बाहेर आले, त्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.