विरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:18 AM2020-12-26T04:18:36+5:302020-12-26T04:18:36+5:30

सोलापूर : केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविण्याचे ...

Opposition continues to provoke farmers | विरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम सुरू

विरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम सुरू

Next

सोलापूर : केंद्र सरकार राबवित असलेल्या योजना शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या आहेत. नव्या कृषी कायद्याविषयी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांना भडकविण्याचे काम विरोधकांकडून होत आहे. भाजपने शेतकऱ्यांविषयी खोटी तळमळ दाखवली नाही आणि दाखवणारही नाही. कृषी कायदा हा शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. यामुळे शेतकरी आपला कोणताही माल कुठेही विकू शकणार असल्याचे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले.

स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण सोलापूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांसाठी शुक्रवारी तेरामैल येथील कृष्णा पॅलेस सांस्कृतिक भवन येथे भाजपकडून ’शेतकरी शिवार संसद’ कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी आ. देशमुख बोलत होते. प्रारंभी अटलबिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी बांधवांना उद्देशून केलेले भाषण यावेळी कार्यालयात मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आले.

यावेळी आमदार देशमुख म्हणाले की, आताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांविषयी बोलणारा, त्यांचा विचार करणारा कुणीही नाही. भाजप सरकारने शेतकऱ्यांना पैसा दिला. ज्या-ज्या वेळी संकट आले त्या-त्या वेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो. शेतकऱ्यांसाठी लाभदायक असा कृषी कायदा पंतप्रधानांनी काढला. हमीभाव, करार, कंत्राटी शेती, शेती करार अशा अनेक बाबींमध्ये असणाऱ्या त्रुटी दूर करून त्यात सुलभता आणून दिली. शेतकऱ्यांचे वर्षानुवर्षे होणारे नुकसान रोखले जावे, हा एकच उद्देश ठेवून हा कायदा करण्यात आला आहे; मात्र दुर्दैवाने आज शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांना भडकविण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता नवा कृषी कायदा व अन्य बाबींची माहिती घ्यावी, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आपण आणि भाजप कायम कटिबद्ध असल्याचे आ. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

या शेतकरी मेळाव्याला दक्षिणचे तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, माजी जिल्हा सरचिटणीस हणमंत कुलकर्णी, एम.डी. कमळे, सचिन पाटील, संगप्पा केरके, गौरीशंकर मेनकुदळे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

----

फोटो : २५ दक्षिण मेळावा

शेतकरी मेळाव्याचे दीप प्रज्वलनाने उद्‌घाटन करताना आमदार सुभाष देशमुख, हणमंत कुलकर्णी, प्रा. एम. डी. कमळे.

Web Title: Opposition continues to provoke farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.