'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन' मोर्चाला सकल मराठा समाजाचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 02:20 PM2019-08-22T14:20:46+5:302019-08-22T14:27:12+5:30
शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन मांडणार भूमिका; माऊली पवार याची माहिती
सोलापूर : सोलापुरात २५ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'सेव्ह मेरिट - सेव्ह नेशन' मोर्चाला सकल मराठा समाजाने विरोध केला आहे.
सेव्ह मेरिट- सेव्ह नेशन ही चळवळ आरएसएस पुरस्कृत असावी असे वाटते. भाजप आणि आरएसएसचे अनेक कार्यकर्ते यात सहभागी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर एका विशिष्ट वर्गात जळफळाट सुरू झाला आहे. अनेक वर्र्षापासून वंचित असलेल्या मराठा समाजाला प्रदीर्घ लढ्यानंतर न्याय मिळाले. परंतु, काही लोक आता हे आरक्षण संपवण्याची भाषा करीत आहे. यापुढील काळात धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाचा आरक्षणाचा निर्णय होणार आहे.
या निर्णयाला विरोध करण्याचे काम 'सेव्ह मेरिट सेव्ह नेशन' या चळवळीतून सुरू आहे. या चळवळींमध्ये सहभागी असलेल्या लोकांनी आजवर ठराविक घटकाचे हीच जोपासण्याचे काम केले. त्यांचा भांडाफोड शुक्रवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात येईल, अशी माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली.