धरणातील सांडपाणी उचलण्यास विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:22 AM2021-05-09T04:22:48+5:302021-05-09T04:22:48+5:30
याबाबत त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवले आहे. यात म्हटले आहे की, उजनीतून उपलब्ध होणारे सांडपाणी इंदापूर येथे ...
याबाबत त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्र पाठवले आहे.
यात म्हटले आहे की, उजनीतून उपलब्ध होणारे सांडपाणी इंदापूर येथे नवीन प्रकल्पात (खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण) सोडण्यास तत्त्वतः मान्यता दिली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांतून उपलब्ध होणारे सांडपाणी उजनी जलाशयामधून ५ टीएमसी पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे उचलून खडकवासला कालव्याच्या १६१ किलोमीटरमध्ये टाकले जाणार आहे; पण उजनी प्रकल्पाचे जलनियोजन यापूर्वीच झाले आहे.
सद्य:स्थितीत उजनी जलाशयांमध्ये कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही. भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे. त्यातच इंदापूरला पाणी दिले जाणार आहे.
सद्य:स्थितीत पुणे महापालिकेच्या वतीने मुंढवा येथे बंधारा बांधून त्यावर प्रक्रिया करून पाणी शुद्ध केले जाते. हे शुद्ध केलेले पाणी खडकवासला कालव्याच्या जुन्या मोठ्या कालव्यात सोडण्यात येते. उर्वरित सांडपाणी पुरंदर उपसा सिंचन योजनेद्वारे पुरंदर, दौंड, बारामती या तालुक्यांसाठी वापरण्यात येते. सध्या सांडपाण्याचा एक थेंबही उजनीत येत नाही.
त्यामुळे प्रस्तावित योजनेस उजनी धरणातून पाणी देणे योग्य नाही. सध्या उजनी जलाशयातील पाण्याचा पूर्ण वापर झाला आहे. मराठवाड्यालादेखील ७.५ टीएमसी पाणी मंजूर केले आहे. या योजनेसाठी ५ टीएमसी पाणी मंजूर केले, तर सोलापूर जिल्ह्यातील योजनांवर फार मोठा परिणाम होऊन जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे, असे आमदार शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे.
----
खडकवासला कालव्यातून पाणी उचला
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांनी प्रक्रिया केलेले पाणी पुण्याजवळून उचलून नजीकच्या खडकवासला कालव्यात सोडून प्रस्तावित योजनेला मान्यता द्यावी. त्यामुळे खर्चही कमी होण्यास मदत होईल. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे पत्रात म्हटले आहे.
-----