शक्तीपीठ मार्गाला मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध
By दिपक दुपारगुडे | Published: June 12, 2024 12:59 PM2024-06-12T12:59:13+5:302024-06-12T13:03:35+5:30
शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.
सोलापूर : जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ,उत्तर सोलापूर,सांगोला या तालुक्यांमधून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती महामार्ग प्रस्तावित असून या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याची पावले सरकारकडून वेगाने उचलली जात असताना या प्रकल्पाला विरोध वाढत आहे.
प्रकल्प बाधित शेतकऱ्यांचा मेळावा पार पडला. योग्य मोबदला दिला नाही तर या प्रकल्पाला एक इंच सुद्धा जमीन देणार नसल्याचा इशारा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी दिला. शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रा. संग्राम चव्हाण व दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मेळावा पार पडला.
डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर-गोवा यादरम्यान नव्यानेच बांधलेले सहा पदरी महामार्ग अस्तित्वात असताना ८५ हजार कोटी खर्चून हा नवा महामार्ग बांधण्याची गरजच काय? असा प्रश्न विचारत सरकारला कंत्राटदारांची घरे भरावयाची आहेत काय? असा सवाल उपस्थित केला. या मेळाव्यास संपर्कप्रमुख शरद पवार,नगरसेवक सत्यवान गायकवाड, दिनेश घागरे, बाळासाहेब पवार, महेश बिले, सागर बिले, प्रभाकर केंगार,गजानन पाटील,राहुल जमदाडे,नागनाथ कापसे, विश्वास चव्हाण,भैय्या चव्हाण,सुनील चव्हाण,अमोल पाटील आदी उपस्थित होते.
२२ मागण्यासांठी शेतकरी आक्रमक
यावेळी शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून दाखला मिळावा व त्यांना त्वरित शासकीय नोकऱ्यांमध्ये संधी मिळावी, महामार्गामुळे खंडित होणारे रस्ते व पडणाऱ्या जमिनीच्या तुकड्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर परिपूर्ण तांत्रिक उपाययोजना व्हावी व शेतकऱ्यांसोबत खासगी वाटाघाटीच्या चर्चेने जमिनीचे बाजार मूल्याप्रमाणे योग्य किंमत व पिकांचे पंचनामा मूल्य ठरवूनच नुकसान भरपाई रक्कम जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसह इतर २२ मागण्या करण्यात आल्या.