विरोधी पक्षांची संघर्ष यात्रा रविवारी सोलापुरात
By admin | Published: March 30, 2017 04:59 PM2017-03-30T16:59:46+5:302017-03-30T16:59:46+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर, ता. ३० : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील विरोधी पक्षांनी आजपासून (बुधवार) सुरू केलेली संघर्ष यात्रा २ व ३ एप्रिलला सोलापूर जिल्ह्यात येत आहे. २ एप्रिलला सायंकाळी सहा वाजता मोहोळ नगरपालिकेच्या समोर जाहीर सभा होणार आहे. २ एप्रिलला सोलापुरात मुक्काम करून ही यात्रा ३ एप्रिलला पंढरपुरात शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन पक्षाचा कवाडे गट, युनायटेड जनता दल, समाजवादी पक्ष व एमआयएम या राज्यातील विरोधी पक्षाच्या वतीने २९ मार्च ते ४ एप्रिल यादरम्यान राज्यातील काही जिल्ह्यांमधून संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे.
या यात्रेत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे आमदार सहभागी झाले आहेत. रविवारी दुपारी तुळजापूर येथून तुळजाभवानीचे दर्शन घेऊन संघर्ष यात्रा मोहोळमध्ये येणार आहे. मोहोळमधील सभा आटोपून सोलापुरात मुक्कामासाठी येणार आहे. सोमवारी सकाळी १० वाजता ही यात्रा पंढरपूरला जाणार आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधून जेजुरीमार्गे सासवडला ही यात्रा रवाना होणार आहे.