कंत्राटी शिक्षक भरतीला विरोध; शिक्षक भारती संघटनेचे उद्या राज्यव्यापी आंदोलन
By Appasaheb.patil | Published: September 13, 2023 03:21 PM2023-09-13T15:21:27+5:302023-09-13T15:22:11+5:30
शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारणी, जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत निर्णय
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: बाह्य यंत्रणेमार्फत शिक्षक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्याचा शासन निर्णय उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या वतीने ६ सप्टेंबर २०२३ रोजी जारी झाला आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांचे भवितव्य उद्ध्वस्त करून त्यांना अंधारात लोटणारा आहे. सुशिक्षित बेरोजगारांच्या स्वप्नांची राख करणारा हा निर्णय आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनिर्बंध शोषण करणारा, समानतेच्या व सामाजिक न्यायाच्या तत्वाला हरताळ फासणारा हा निर्णय आहे. या निर्णयाच्या विरोधात शिक्षक भारती संघटना उद्या १३ सप्टेंबर २०२३ रोजी राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.
दरम्यान, शिक्षक भारतीच्या राज्य कार्यकारणी आणि जिल्हाध्यक्ष यांच्या बैठकीत हा निर्णय झाला. हे आंदोलन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार असून राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात शिक्षण निरीक्षक, शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी, तलाठी, तहसिलदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, लोक प्रतिनिधी यांना शिक्षक भारतीच्यावतीने निवेदन देण्यात येणार आहे. तरी या आंदोलनात स्थानिक पदाधिकारी, सुशिक्षित बेरोजगार युवक, युवती, स्पर्धा परीक्षांची तयारी करणरे युवक, युवती, स्थानिक सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामस्थांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक भारतीच्यावतीने सोलापूरचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांनी लोकमत शी बोलताना केले आहे.