सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडकामाला उच्च न्यायालयाची स्थगिती, जिल्हाधिकाºयांना दिले आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:02 AM2017-11-11T11:02:32+5:302017-11-11T11:03:42+5:30
कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने को जनरेशन प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या चिमणीचे पाडकाम पुढील आदेश होईपर्यंत करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. केमकर व जी. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी शासन व जिल्हाधिकाºयांना दिले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ११ : कुमठे येथील श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याने को जनरेशन प्रकल्पासाठी बेकायदेशीरपणे उभ्या केलेल्या चिमणीचे पाडकाम पुढील आदेश होईपर्यंत करू नये असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. एस. एस. केमकर व जी. एस. कुलकर्णी यांनी शुक्रवारी शासन व जिल्हाधिकाºयांना दिले.
विमानतळास अडसर ठरणारी सिद्धेश्वर को जनरेशन प्रकल्पाची चिमणी पाडकामाचे आदेश शासनाने दिले होते. ११ आॅगस्ट रोजी मनपाचे पथक पाडकामासाठी कारखानास्थळावर गेल्यावर शेतकरी सभासदांनी विरोध केला. त्यावर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी कारखानास्थळावर येऊन कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्याकडून हमीपत्र घेतल्यावर तीन महिन्यांसाठी ही कारवाई स्थगित करण्यात आली होती. हमीपत्राची मुदत ११ नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यामुळे पाडकामाबाबत मनपा प्रशासनाकडून पुन्हा तयारी सुरू झाली होती.
या दरम्यान जिल्हाधिकाºयांनी ६ एप्रिल २0१७ व १५ मार्च २0१७ रोजी चिमणी पाडकामासंदर्भात काढलेल्या आदेशाला कारखान्यातील कामगार युनियनचे सचिव अशोक बिराजदार यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. कारखान्याची चिमणी पाडली तर कारखान्याचे कामगार व ऊसतोड कामगार, ऊस उत्पादक शेतकºयांवर परिणाम होईल असे निदर्शनाला आणले होते. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पाडकामास स्थगिती दिली. यात युनियनतर्फे अॅड. विनीत नाईक यांनी काम पाहिले.
------------------
१६ रोजी मंत्रालयात बैठक
सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी हटविण्याबाबत शासनाचे कक्ष अधिकारी मिलिंद हरदास यांनी १६ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात दुपारी साडेतीन वाजता विमानचालनचे प्रधान सचिवांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केल्याचे जिल्हाधिकाºयांना कळविले आहे.
-------------------
मुख्यमंत्र्यांकडूनही ‘चिमणी’ला स्थगिती
श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडकामाला राज्य शासनाने चार महिन्यांची स्थगिती दिली आहे, अशी माहिती महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. सध्या कारखान्याचा गळीत हंगाम सुरू आहे. अशावेळी चिमणी पाडली तर त्याचा गाळपावर परिणाम होईल आणि शेतकºयांचे मोठे नुकसान होणार आहे, अशा आशयाचे निवेदनही त्यांना दिले होते. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय दिला. नवीन चिमणी बांधण्याचे काम होईपर्यंत जुनी चिमणी पाडण्यात येणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. चिमणी अन्य जागी स्थलांतर करण्याबाबत योग्य ती प्रक्रिया लवकर पूर्ण करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे महापौरांनी सांगितले.