वृद्ध मातेला पोटगी देण्याचा मुलास आदेश, जिल्हा न्यायालयाचा आदेश, निवासासाठी दोन खोल्या देण्याचाही बजावला आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 02:21 PM2018-01-16T14:21:28+5:302018-01-16T14:23:34+5:30
वडिलांच्या निधनानंतर मातेस न सांभाळणाºया पूर्व भागातील महेश सत्यमूर्ती येमूल (वय ४०, रा. १९४, अशोक चौक, सोलापूर) यास वृद्ध आई सिद्धम्मा सत्यमूर्ती येमूल (वय ६८)हिस उपजीविकेसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगीपोटी रक्कम देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका जाधव यांनी बजावला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १६ : वडिलांच्या निधनानंतर मातेस न सांभाळणाºया पूर्व भागातील महेश सत्यमूर्ती येमूल (वय ४०, रा. १९४, अशोक चौक, सोलापूर) यास वृद्ध आई सिद्धम्मा सत्यमूर्ती येमूल (वय ६८)हिस उपजीविकेसाठी दरमहा १० हजार रुपये पोटगीपोटी रक्कम देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका जाधव यांनी बजावला. याशिवाय मुलगा राहत असलेल्या घरजागेतील दोन खोल्याही निवासासाठी देण्याचे आदेश केले आहेत.
या दाव्याची पार्श्वभूमी अशी की, यातील वृद्ध माता सिद्धम्मा यांचे पती सत्यमूर्ती येमूल यांचे २६ जानेवारी २०१० रोजी निधन झाल्यानंतर मुलगा महेश व सून कल्पना हे सिद्धम्माला राहत असलेल्या ठिकाणी त्रास देत असत. मारहाणीबरोबर दिवसातून एकवेळ उपाशी ठेवले जात असे. मुलगा आईशी अपमानास्पद बोलून तिचा मानिसक छळ करत असे. राहत्या घरातूनही तिला हाकलून दिले. तिला उपजीविकेसाठी लागणारी कोणतीच सोय करण्यात आली नाही. या प्रकाराने असहाय्य झालेल्या सिद्धम्माने अॅड. श्रीनिवास कटकूर व किरण कटकूर यांच्यामार्फत महिलांचा संरक्षण कायदा व कौटुंबिक हिंसाचार कायदा २००५ कलम १२ अन्वये मुलगा व सून यांनी वृद्व मातेस कौटुंबिक हिंसाचार केल्याबद्दल कारवाई करावी व त्यांच्याकडून पोटगी मिळावी म्हणून सोलापूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सारिका जाधव यांच्याकडे फौजदारी दावा दाखल केला.
न्यायालयाने वृद्ध मातेचा जबाब घेतला. त्यांच्या वकिलांनी आपल्या युक्तिवादात मुलगा महेश हा एकुलता एक असून, टेक्स्टाईल कारखानदार आहे. त्याला दरमहा ६५ हजार उत्पन्न आहे. त्याची मातेला जास्तीत जास्त पोटगी देण्याची ऐपत आहे. त्याने आईला मिळकत हडप करण्याच्या हेतूने घरातून हाकलून दिले, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेऊन मुलगा महेश व सून कल्पना यांनी मातेविरुद्ध कोणत्याही प्रकारचा शारीरिक, मानसिक छळ करू नये, आईस दरमहा १० हजार रुपये अर्ज दाखल केलेल्या ५ मे २०१६ पासून निरंतर पोटगी देण्याचा आदेश दिला. तसेच मुलगा राहत असलेल्या घर नं. १९४, अशोक चौक, सोलापूर या मिळकतीमध्ये सर्व सोयीनियुक्त दोन खोल्या राहण्यासाठी देण्याचे आदेशात म्हटले आहे. या आदेशाची अंमलबजावणी संरक्षण अधिकारी पोलीस ठाण्यामार्फत करण्याचा आदेश पारित केला आहे. या कामी अॅड. श्रीनिवास कटकूर व किरण कटकूर यांनी काम पाहिले.
----------------
मुलगा-सुनेला चपराक...
- समाजात अशा प्रकारच्या घटना अनेक ठिकाणी घडतात. न्यायालयापुढे ज्या माता पुढाकार घेऊन धाव घेतात तेव्हाच अशा बाबी निदर्शनाला येतात. न्यायालयाच्या या आदेशामुळे दाव्यातील मुलगा आणि सुनेला चपराक बसली असून, संभाव्य घटनांना यानिमित्ताने आळा बसावा, अशी अपेक्षा तक्रारदार मातेचे वकील अॅड. श्रीनिवास कटकूर यांनी व्यक्त केली.