नुकसानीची पाहणी करताच उपमुख्यमंत्र्यांचे पंचनामे करण्याचे जिल्हाधिका-यांना आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:21 AM2021-04-15T04:21:36+5:302021-04-15T04:21:36+5:30
पंढरपूर तालुक्यातील करकंब, बार्डी आणि जाधववाडी येथे मागील दोन दिवसांपासून सतत होत असलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या ...
पंढरपूर तालुक्यातील करकंब, बार्डी आणि जाधववाडी येथे मागील दोन दिवसांपासून सतत होत असलेला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या द्राक्षबागा आणि बेदाणा भिजून मोठे नुकसान झाले. याची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.
यावेळी आ. संजय शिंदे, वसंतराव काळे कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, इंडियन शुगरचे चेअरमन रणजितसिंह शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक नरसाप्पा देशमुख, उपसरपंच आदिनाथ देशमुख, ॲड. शरद पांढरे, प्रा. सतीश देशमुख, अभिषेक पुरवत, राहुल शिंगटे, पांडुरंग व्यवहारे, अजित देशमुख उपस्थित होते.
अजित पवार यांनी करकंब येथील विवेक शिंगटे, दिलीप व्यवहारे यांची द्राक्षबाग आणि भिजलेल्या बेदाण्याची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी बेदाणा किती भिजला, किती नुकसान झाले, पाण्याची व्यवस्था कशी व कुठून केली, यासह विविध अडचणी जाणून घेतल्या. यानंतर विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना फोन करून नुकसानीची माहिती देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बेदाण्याचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. शिवाय आमच्या स्तरावर नुकसान पोहचलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले.
येथील शेतकऱ्यांनी शासनाच्या मागेल त्याला शेततळ्याचे अनुदान बंद आहे, ते त्वरित सुरू करण्याची मागणी पवार यांच्याकडे केली. याला अजित पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्वरित निर्णय घेण्याचे अभिवचन दिले. यानंतर बार्डी येथील दिनकर कवडे यांच्या वादळी वाऱ्याने पडलेल्या द्राक्षबागेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहणी केली.
मागचं सालच बरं होतं...
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे द्राक्ष कवडीमोल भावाने विकावी लागली. शिवाय बेदाण्याला अपेक्षित भाव मिळाला नाही, तर चालू हंगामात ४० टक्क्यांपेक्षा जास्त द्राक्षबागांना माल आला नाही आणि आलेल्या मालापासून तयार केलेला बेदाणा भिजून नुकसान झाले. त्यामुळे ‘मागचं सालच बरं होतं दादा, शेती कशी करायची’ अशी कैफियत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर मांडली.
फोटो ::::::::::::::::::::::::
करकंब येथील अवकाळी पावसाने बेदाण्याच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार व अन्य.