उजनीतून इंदापूरला पाणी उचलण्याचा तो आदेश रद्द; जयसंपदा मंत्र्यांची घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 12:19 PM2021-05-19T12:19:34+5:302021-05-19T12:19:40+5:30
जयंत पाटील यांची घोषणा : सोलापूर जिल्ह्यातून वाढला होता विरोध
सोलापूर: उजनी धरणातून इंदापूरसाठी पाच टीएमसी पाणी उचलण्यासाठी सर्वेक्षण करण्याचा दिलेला आदेश रद्द करण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी केली.
पुणे पिंपरी चिंचवडचे आलेले सांडपाणी इंदापूर तालुक्याला उचलण्यासाठी शेटफळ गढी उपसा जलसिंचन योजनेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याची माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर दौऱ्यात दिली होती. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात उजनीच्या पाण्यावरून वादळ उठले हाेते पण नंतर भरणे यांनी खुलासा करताना उजनीतून एक थेंब पाणी नेणार नाही, अशी भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर त्यांनी इंदापुरातील कार्यकर्त्यांसमोर केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. ‘यह तो ट्रेलर है, अभी पिक्चर बाकी है’ असे म्हणत भरणे यांनी उजनीतून इंदापूर व बारामतीसाठी कशा पद्धतीने पाणी उचलण्याच्या योजना तयार केल्या आहेत, हे स्पष्ट केले होते. त्यावरून उजनीचे पाणी इंदापूर व बारामतीला पळविणार म्हणून शेतकऱ्यांचा रोष वाढला. यादरम्यानच जलसंपदा विभागाने खडकवासला उपसा सिंचन योजनेचे सर्वेक्षण करण्याचे आदेश २२ एप्रिल रोजी काढले होते. त्यानंतर जिल्ह्यात पालकमंत्री भरणे यांच्या विरोधात आंदोलने सुरू झाली.
या पार्श्वभूमीवर आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना १७ मे राेजी उजनी जलाशयातून प्रस्तावित केलेल्या इंदापूर तालुक्यातील खडकवासला प्रकल्पाच्या स्थिरीकरण योजनेस स्थगिती देण्याबाबत पत्र दिले. या पत्रात त्यांनी पुणे पिंपरी चिचवड शहरातून उपलब्ध होणारे ५ टीएमसी सांडपाणी उजनी जलाशयातून उपसा सिंचन योजनेद्वारे उचलण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. वास्तविक उजनी प्रकल्पाचे जलनियोजन यापूर्वीच झाले आहे. सद्य:स्थितीत उजनी जलाशयात कोणतेही अतिरिक्त पाणी उपलब्ध नाही तसेच भीमा खोरे हे तुटीचे खोरे आहे. सांडपाण्याच्या पुनर्वापरातून ही योजना तत्त्वत: मान्य केल्याचे दिसते. पण दौंड व बंडगार्डन येथे वरच्या भागातू्न येणारे पाणी मोजण्याची यंत्रणा आहे. ऑक्टोबर ते जून या काळात वरच्या भागातून थेंब पाणी येत नसल्याचे स्पष्ट केले आहे. उजनी जलाशयातील पाण्याचा पूर्ण वापर झालेला आहे तसेच मराठवाड्यालाही पाणी मंजूर केलेले आहे. पुन्हा उजनीतून पाच टीएमसी पाणी मंजूर केले तर सोलापूर जिल्ह्यांतील योजनांवर परिणाम होऊन शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
जयंत पाटील यांची घोषणा
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, माजी आमदार दीपक साळुंके, उमेश पाटील, उत्तम जानकर, कल्याणराव काळे यांनी भेट घेऊन खडकवासला स्थिरीकरण योजनेस स्थगिती देण्याचे निवेदन दिले. त्यानंतर उभयतांमध्ये झालेल्या चर्चेनंतर पाटील यांनी उजनी पाणी वाटपात सोलापूरच्या हक्काच्या थेंबालाही धक्का लागणार नाही. २२ एप्रिल रोजी खडकवासला स्थिरीकरण याेजनेच्या सर्वेक्षणाबाबत काढलेला आदेश रद्द करण्यात येईल अशी घोषणा केली.
ते पाणी पुण्यातूनच घ्या
जलसंपदा विभागाच्या म्हणण्याप्रमाणेजर पुणे पिंपरी चिंचवड येथून ६.९० टीएमसी सांडपाणी उपलब्ध होत असेल तर हे पाणी पुण्याजवळून उचलून खडकवासला कालव्यात नेण्यात यावे. त्यामुळे खर्चही कमी होईल तसेच उजनी धरणावर अवलंबून असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, अशी भूमिका या शिष्टमंडळने जलसंपदा मंत्र्यांसमोर मांडली.
भाजपचे आंदोलन होणारच
खडकवासला प्रकल्प रद्द केल्याचे अधिकृत लेखी आदेश निघत नाही. तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील नागरिक कदापि या घोषणेवर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे भाजपचे सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचे शुक्रवारी पंढरपुरातील नामदेव पायरीजवळच आंदोलन होणारच आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे.