सोलापुरातील ‘लोकमंगल’ला ५ कोटी भरण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 10:49 AM2018-11-23T10:49:20+5:302018-11-23T10:51:49+5:30
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या परिवारातील लोकमंगल मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटी या सोलापुरच्या संस्थेने दुग्धशाळेचे विस्तारीकरण व १० ...
सोलापूर : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या परिवारातील लोकमंगल मल्टिस्टेट को आॅपरेटिव्ह सोसायटी या सोलापुरच्या संस्थेने दुग्धशाळेचे विस्तारीकरण व १० मे. टन दूग्धभूकटी निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी खोटी कागदपत्रे दिल्याच्या तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे त्यांना दिलेले ५ कोटी रुपये परत घेण्याचे आदेश कृषी व पशुसंवर्धन विभागाने गुरुवारी उशिरा काढले.
अधिवेशन काळातच हा शासन आदेश निघाल्यामुळे सहकारमंत्री देशमुख यांना विरोधकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधकांनी यावरुन देशमुख यांचा राजीनामा मागितला होता.
मात्र त्यात काहीही चुकीचे घडलेले नाही अशी भूमिका सरकारने घेतली होती. पण चौकशीअंती लोकमंगलची कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हा निर्णय घेतला गेला आहे. याबाबतची तक्रार २३ आॅक्टोबर रोजी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीला २४.८१ कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प मंजूर करण्यात आला होता. हा प्रकल्प केंद्राच्या एनपीडीडी या कार्यक्रमांतर्गत निधीसाठी पात्र होता.
२४ कोटींचा प्रकल्पच रद्द करण्याचा निर्णय
लोकमंगल यांचा २४ कोटींचा प्रकल्प व सर्व प्रस्तावच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे सदर संस्थेस दिलेले ५ कोटी तातडीने राष्ट्रीय कृषि विकास योजना कक्षाकडे जमा करावे व त्याची कार्यवाही आयुक्तांनी पूर्ण करण्याचा आदेश काढला आहे.