साडेआठ कोटींच्या पाईप खरेदीचा आदेश
By admin | Published: June 20, 2014 12:50 AM2014-06-20T00:50:03+5:302014-06-20T00:50:03+5:30
चंद्रकांत गुडेवार : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
सोलापूर : सोलापूर शहराला हद्दवाढ भागासह सर्व प्रभागाला सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी मुंबई येथील लँडको कंपनीला साडेआठ कोटी रुपयांच्या पाईप खरेदीचा आदेश देण्यात आला आहे, अशी माहिती चंद्रकांत गुडेवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शहराला पाणीपुरवठा करणारी यंत्रणा तोकडी पडत असून हद्दवाढ भागात अंतर्गत पाईपलाईन नसल्याने सुरळीत पाणीपुरवठा करणे कठीण जात आहे. पाणीपुरवठ्याची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने ८.५ कोटींचे आदेश देण्यात आले आहेत. मक्तेदाराला मध्यस्थी न करता हा आदेश मनपा प्रशासनाकडुन थेट देण्यात आला आहे. या पाईप खरेदीमध्ये मक्तेदाराची मध्यस्थी नसल्याने महापालिकेच्या सव्वादोन कोटींची बचत होणार आहे. येत्या दोन ते अडीच महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण होणार असून पाईप खरेदी झाल्यास प्रभागनिहाय मागणी होईल तशा पद्धतीने पुरवठा केला जाईल, असेही यावेळी आयुक्त चंद्रकांत गुडेवार म्हणाले.
एल.बी.टी. वसुलीसंदर्भात विक्रीकर अधिकाऱ्यांची मागणी संबंधित कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यानुसार अधिकारी महापालिकेस मिळाल्यास एल.बी.टी. वसुलीच्या कामाला सुरुवात होईल. वसूल झालेला एल.बी.टी. महापालिकेकडेच जमा होणार आहे. काही झाल्यास व्यापाऱ्यांना एल.बी.टी. कर हा भरावाच लागणार आहे. नियमाचे पालन न झाल्यास कायदेशीर कारवाई ही होणारच आहे, असेही एल.बी.टी.बाबत बोलताना आयुक्त म्हणाले.
------------------------
खड्ड्यांचा अहवाल द्या...
शहरात झालेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठून खड्डे होत आहेत. हे खड्डे कोठे कोठे आहेत, किती आहेत याची संपूर्ण माहिती मला रात्री ११ वाजता किंवा सकाळी ८ वाजेपर्यंत द्या, असा आदेश आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी सर्व विभागीय कार्यालय अधिकारी, अभियंत्यांना दिला आहे.