मरवडेतील अतिक्रमित बांधकाम काढून टाकण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:39+5:302021-07-14T04:25:39+5:30
मरवडे येथील सार्वजनिक आडोसा शौचालयाच्या मातीच्या भरावावर सुरू असलेले बेकायदेशीर घरकूल बांधकाम एक महिन्याच्या मुदतीत काढून टाकण्याची लेखी हमी ...
मरवडे येथील सार्वजनिक आडोसा शौचालयाच्या मातीच्या भरावावर सुरू असलेले बेकायदेशीर घरकूल बांधकाम एक महिन्याच्या मुदतीत काढून टाकण्याची लेखी हमी सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी ७ जुलै रोजी गटविकास अधिकारी यांच्यामार्फत मरवडे ग्रामस्थांना दिली होती.
मात्र त्याच दिवशी संबंधित लाभार्थ्यांने विटा व अन्य बांधकाम साहित्याचा त्या परिसरात साठा करून बेकायदेशीरपणे ८ व ९ जुलै रोजी सार्वजनिक जागेत बांधकाम केलेले आहे. सदरचे संपूर्ण बांधकाम साहित्य तत्काळ हटवून हे काम त्वरित थांबविण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी मरवडे ग्रामपंचायतीच्या विद्यमान ६ सदस्यांनी व ग्रामस्थांनी ८ जुलै रोजी निवेदनाद्वारे केली होती.
सदरच्या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामसेवकावर प्रशासकीय कारवाईची मागणीही माजी उपसरपंच विजय पवार यांनी निवेदनाद्वारे केली होती.
-----
अहवाल सादर करण्याच्या सूचना
या पार्श्वभूमीवर गटविकास अधिकारी सुप्रिया चव्हाण यांनी ९ जुलै रोजी मरवडे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांना नोटीस बजावली असून सदरचे बांधकाम सुरू असताना केलेले दुर्लक्ष हा कार्यालयीन शिस्तीचा भंग करणारी बाब असून नियमाप्रमाणे चोवीस तासांत सदरचे बांधकाम काढून घेण्याची कार्यवाही करावी व तसा अहवाल पंचायत समितीकडे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.