बार्शी टेक्स्टाइल मिल ३१ मार्चपासून सुरू करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:23 AM2021-03-16T04:23:29+5:302021-03-16T04:23:29+5:30
संपूर्ण देशातील लॉकडाऊनच्या प्रक्रियेनंतर काही काळाने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर २२ मार्च २०२० पासून ही मिल बंद होती. ...
संपूर्ण देशातील लॉकडाऊनच्या प्रक्रियेनंतर काही काळाने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर २२ मार्च २०२० पासून ही मिल बंद होती. या आदेशानंतर मिल चालू करण्यासाठी ३ कोटी रुपयांची गरज असली तरी सध्या मिल व्यवस्थापनाने सफाईची कामे मिल प्रशासनाकडून चालू करण्यात आली आहेत.
या मिलमध्ये कापसापासून सूत तयार करण्याचे काम केले जाते. त्यासाठी या मिलमध्ये १५० महिला व ३०० पुरुष कामगार आपली उपजीविका करत होते, परंतु या अनलॉकच्या प्रक्रियेपासून ही मिल बंद झाल्याने अनेक कामगारांचा रोजगार बंद झाला, पण आता हा आदेश प्राप्त झाल्याने या कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कामगारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बंद पडलेली ही मिल पूर्ववत सुरू करण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खा. ओमराजे निंबाळकर यांच्याकडे पत्रव्यवहार करून मिल सुरू करण्याची मागणी केली होती. तसेच शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनीही मिलच्या गेटसमोर आंदोलनही केले होते. त्याचा सतत पाठपुरावा झाल्याने त्यास यश आले असून ४५० कामगारांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागला आहे.
फोटो
१५बार्शी-मिल