पंढरपुरातील पंतप्रधान आवास योजनेच्या कामात स्थगिती देण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:23 AM2021-01-25T04:23:08+5:302021-01-25T04:23:08+5:30
शहरातील गोरगरीब जनतेची राहण्याची सोय व्हावी. यासाठी पंढरपूर नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत ...
शहरातील गोरगरीब जनतेची राहण्याची सोय व्हावी. यासाठी पंढरपूर नगर परिषदेने पंतप्रधान आवास योजनेचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पांतर्गत २००० घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, हा प्रकल्प पूररेषेत बांधला जातोय. मागील वर्षी आलेल्या पुरादरम्यान पुराचे पाणी त्या प्रकल्पामध्ये होते.
त्यामुळे त्यादरम्यान प्रकल्प बंद करण्यात आला होता. त्याच बरोबर कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी दिवंगत आमदार भारत भालके व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या प्रकल्पाची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना देण्यात आले होते. त्याचबरोबर शेतजमीन व दलदलीचा भाग, काळी माती असलेल्या ठिकाणी प्रकल्पाचे काम होत आहे. त्या ठिकाणी राहण्यास येणाऱ्या २ हजार कुटुंबांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
यामुळे या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी. तसेच पूररेषेत प्रकल्प सुरू करणाऱ्या नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सुटीचे सुरू असलेले काम थांबवावे. हा प्रकल्प दुसऱ्या योग्य ठिकाणी उभारला जावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, पंढरपूर शहराध्यक्ष संदीप मांडवे यांनी नगर विकास ऊर्जा आदिवासी विकास उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत त्यांनी या प्रकल्पाची उच्चस्तरीय चौकशी करावी चौकशी अहवाल येण्यापर्यंत योजनेस स्थगिती द्यावी, असे आदेश संबंधित विभागाला दिले आहे.
यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी या प्रकल्पाची पाहणी केली. त्याचबरोबर त्याठिकाणीच प्रांत अधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, प्रकल्पाशी निगडित लोकांची बैठक घेतली. शंभरकर हे दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी तज्ज्ञ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यार आहेत. त्यानंतर संबंधित कामाविषयी निर्णय होणार आहे.
फोटो ओळी ::::::::::::::::: २४पंड०४
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या घरांची पाहणी करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पंकज जवळे, प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर आदी.