उजनीतून इंदापूरला पाणी नेण्याचा आदेश रद्द; शासनाने काढला लेखी आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 03:06 PM2021-05-27T15:06:10+5:302021-05-27T15:08:22+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकींग
सोलापूर - उजनीचे ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला नेण्यासाठी प्रस्तावित केलेल्या योजनेच्या सर्वेक्षणाचे आदेश रद्द करण्यात येत असल्याचे जलसंपदा विभागाचे उपसचिव वैजिनाथ चिल्ले यांनी गुरूवारी दुपारी जारी केले.
जलसंपदा विभागाचे उपसचिव चिल्ले यांनी २२ एप्रिल रोजी उजनी धरणातून ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील खडकवासला उपसा सिंचन योजनेमध्ये नेण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी देण्याबाबतचे आदेश जारी केले होते. त्यानंतर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पंढरपूर दौर्यात इंदापूरला उजनीतून ५ टीएमसी पाणी नेण्यास शेटफळ गडी उपसा सिंचन योजनेला शासनाने मंजूरी दिल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर या योजनेच्या कामास सोलापूर जिल्ह्यातील तीव्र विरोध झाला. शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधींनी या निर्णयास विरोध केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप आमदार व खासदारांनी उजनीतून इंदापूरला पाणी नेण्यास विरोध केला होता.
राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे, आ. यशवंत माने या तिघांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. उजनी पाणी वाटपाची वस्तूस्थिस्थी निर्दशनास आणली. त्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी २२ तारखेचा आदेश रद्द केल्याचे जाहीर केले होते, त्याबाबत लेखी आदेश निघाला नसल्याने जनहित शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी उजनी धरणाच्या प्रवेशव्दारावर आंदोलन सुरूच ठेवले होते. त्यामुळे शासनाने २७ मे रोजी दुपारी रद्द चा आदेश जारी केला आहे.