आरोग्य विमा नाकारणाऱ्या कंपनीस ८० हजार रुपये ग्राहकाला देण्याचे आदेश
By दिपक दुपारगुडे | Published: June 10, 2023 03:07 PM2023-06-10T15:07:43+5:302023-06-10T15:08:26+5:30
जर ३० दिवसांत पैसे दिले नाहीत तर त्यावर ६ टक्के व्याजदाराने पैसे दयावे लागतील, असे आदेश आयोगाचे अध्यक्ष अ. सि. भैसारे व सदस्य महंत गाजरे यांनी ९ जून रोजी दिला.
सोलापूर : आरोग्य विमा काढल्यानंतर शस्त्रक्रिया झाल्यानंतर विमा क्लेम नाकारणाऱ्या केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी प्रा. लिमिटेडला जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने ८० हजार रूपये तक्रारदाराला देण्याचे आदेश दिले आहेत. जर ३० दिवसांत पैसे दिले नाहीत तर त्यावर ६ टक्के व्याजदाराने पैसे दयावे लागतील, असे आदेश आयोगाचे अध्यक्ष अ. सि. भैसारे व सदस्य महंत गाजरे यांनी ९ जून रोजी दिला.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार जगन्नाथ आनंदराव जानकर हे सध्या पुणे येथे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार यांनी मार्च २०२१ मध्ये आरोग्य विमा काढला होता. पोलीस निरीक्षक जानकर यांच्यावर ऑगस्ट २०२१ मध्ये शस्त्रक्रिया झाली. त्याचवेळी तक्रारदार यांनी केअर हेल्थ कंपनीस सदर शस्त्रक्रियेबाबत सूचना दिली व होणारे वैद्यकीय खर्च कॅशलेस फॅसिलिटी दया अशी विनंती विमा कंपनीस केली होती परंतु कंपनीने तक्रारदारांना कॅशलेसची सोय देण्याचे टाळाटाळ केली.
शिवाय विमा कंपनीने तक्रारदार पोलीस निरीक्षक जानकर यांचा वैद्य विमा नामंजूर केला. या प्रकरणी पोलीस निरीक्षक जानकर यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे ॲड. रूपेश महिंद्रकर यांचे मार्फत तक्रार दाखल केली. ॲड. रूपेश महिंद्रकर यांचा युक्तिवाद व पुरावे ग्राह्य धरून आयोगाने तक्रारदार जानकर यांना ६५ हजार रूपये नुकसान भरपाई द्यावी ही रक्कम ३० दिवसांत न दिल्यास आदेशाच्या तारखेपासून दसादशे ६ टक्के व्याजाने रक्कम तक्रारदाराला द्यावी लागेल व तक्रारीच्या खर्चा पोटी १० हजार व मानसिक त्रासापोटी ५ हजार असा एकुण ८० हजाराचा दंड इंन्शुरन्स कंपनीस ठोठावला.