अवयवदान दिन; जगात दरवर्षी ३ हजार हृदयांचे होते प्रत्यारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 12:54 PM2018-08-13T12:54:19+5:302018-08-13T12:57:03+5:30
जागतिक अवयवदान दिन : अवयवदान वैद्यकीय चमत्कार !
विलास जळकोटकर
सोलापूर: वैद्यकीय क्षेत्रात चमत्कार ठरलेल्या अवयवदान चळवळीला तीन-चार वर्षांपासून सोलापुरात गती मिळतेय. भारतात या चळवळीला २४ वर्षे तर जगात ५१ वे वर्ष पार पडले. १९९४ साली दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये भारतात सर्वप्रथम हृदयाचे प्रत्यारोपण झाले.
१९८० नंतर ही चळवळ सुरु झाली. शासनाच्या पुढाकाराने या मोहिमेला बळ मिळू लागले आहे. जनतेमध्येही जाणीवजागृती वाढीस लागली आहे. जगामध्ये दरवर्षाला सर्वसाधारणत: ३ हजार हृदयांचे प्रत्यारोपण होते. ही चळवळ म्हणजे समाजाला मिळालेले वरदान असल्याची भावना हृदय शल्यविशारद डॉ. विजय अंधारे यांनी जागतिक अवयवदान दिनाच्या पूर्वसंध्येला लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
१३ आॅगस्ट अवयवदान दिन म्हणून गेल्या ८ वर्षांपासून भारतात साजरा होऊ लागला. अवयवदान ही एक काळाची गरज आहे़ किडनी, डोळे, यकृत या अवयवदानाबरोबरच आजकाल हृदय अवयवदानाची चळवळ वेग घेत आहे. १९६७ साली साऊथ आफ्रिकेमध्ये ख्रिश्चन बर्नाड यांनी एका मनुष्यामधील हृदय दुसºया मनुष्यामध्ये प्रत्यारोपित केले.
१९८० साली हृदय प्रत्यारोपण झाल्यानंतर शरीर त्याला नाकारू नये म्हणून औषधांचा शोध लागला आणि त्यानंतर या चळवळीने वेग पकडला. भारतामध्ये डॉ़ वेणुगोपाल यांनी पहिले हृदय प्रत्यारोपण दिल्ली येथे एम्स हॉस्पिटलमध्ये १९९४ साली केले. हृदय प्रत्यारोपण झालेले ५० टक्के रुग्ण १० वर्षे व्यवस्थित जगू शकतात. ज्या रुग्णांचे हृदय निकामी झाले आहे, हृदयाचे काम ३५% पेक्षा कमी आहे आणि पेशंटचा रक्तदाब कितीही औषधे दिली, उपाययोजना केल्या तरी वाढत नाही त्यावेळी हदय प्रत्यारोपणाचा पर्याय विचारात घेतला जाऊ शकतो, असे हृदयमित्र अंधारे यांनी स्पष्ट केले.
अवयवदान दिनाच्या निमित्ताने मृत्यूशी कवटाळणाºया आणि ब्रेनडेड झालेल्या रुग्णांच्या नातलगांनी मृत्यूनंतरही आपल्या आप्तचे अवयव कोणाच्यातरी कामी यावेत ही भावना वाढीस लागावी, अशी अपेक्षा वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली. याशिवाय अवयवदान केलेल्या रुग्णाच्या वारसाबद्दल ठोस असे कृतिशील धोरण अवलंबावे, अशीही अपेक्षा सुजाण नागरिकांनी व्यक्त केली.
हृदय प्रत्यारोपणाचे निकष...
हृदय अवयव मिळणे एकूणच कठीण असल्यामुळे हृदय प्रत्यारोपण करताना एखाद्या रुग्णाचा मेंदू मृत (ब्रेन डेड) झाला असेल आणि तो बरे होण्याची काही शक्यता नसेल, त्यांच्या नातेवाईकांनी संमती दिली तरच हृदयासह अन्य अवयवांचे प्रत्यारोपण करता येते.
रुग्णांचे हृदय प्रथम तपासले जाते. हृदयाचे काम ४५ टक्क्यांपेक्षा जास्त आवश्यक आहे. हृदय देणारा आणि स्वीकारणाºया दोघांचा रक्तगट आणि शरीराचे आकारमान मिळतेजुळते असणे गरजेचे आहे. रक्तदाब व्यवस्थित असेल आणि अवयवदात्याला कोणताही जंतूसंसर्ग नसेल तर त्याच्या अवयवदानाचे प्रत्यारोपण करता येत असल्याचे डॉ. अंधारे यांनी सांगितले.
सोलापूर अवयवदानात अग्रेसर...
सोलापुरात यापूर्वी अश्विनी सहकारी रुग्णालय, अश्विनी ग्रामीण रुग्णालय, कुंभारी येथून उस्मानाबादच्या पार्थ कोळी यांच्यासह अन्य दोघे, शासकीय रुग्णालयात बसवकल्याण येथील ओंकार अशोक महिंद्रकर, यशोधरा हॉस्पिटलमध्ये सविता डिकरे, कालिका महामुनी, चंद्रकांत घोळसगावकर, प्रकाश भागवत, सतीश पलगंटी, कृष्णाहरी बोम्मा आणि आता रवींद्र शिंगाडे अशी अवयवदान केलेल्यांची नावे आहेत. सोलापुरात नवव्यांदा ग्रीन कॅरिडोर निर्माण करुन अवयवदानाच्या दृष्टीने सोलापूर आघाडीवर राहिला आहे.
अवयवदान हे एक वरदान आहे. वैद्यकीय क्षेत्रात हा चमत्कार म्हणावा लागेल. यामुळे अवयव प्रत्यारोपणानंतर हृदयरुग्णाला ३०-३२ वर्षे आयुष्य मिळू शकते. अवयवदानाबद्दल अलीकडच्या काळात जागरुकता वाढते आहे. जनतेमधूनही सकारात्मक सूर भावना निर्माण होत आहे. ती आणखी व्यापक स्वरुपात वाढावी, हीच अपेक्षा.
-डॉ. विजय अंधारे, हृदयशल्यविशारद