सोलापुरात असलेल्या मिलिंद नगरातील अस्थिविहाराची त्रेसष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 09:47 AM2019-12-06T09:47:23+5:302019-12-06T09:52:55+5:30
महापरिनिर्वाण दिन : मुंबई, नागपूरनंतर नतमस्तक होण्याचे ठिकाण
संताजी शिंदे
सोलापूर : देशातील जाती-पातीचा भेदभाव आणि अस्पृश्यतेला मुळापासून नष्ट करणे. अस्पृश्यतामुक्त समाजाची निर्मिती करून समाजात क्रांती आणणे, सोबतच सर्वांना समानतेचा अधिकार देणे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून भारतीय संविधान तयार केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिविहाराला ६३ वर्षे पूर्ण होत आहेत. मुंबई, नागपूरनंतर नतमस्तक होण्याचे तिसरे ठिकाण म्हणून सोलापुरातील अस्थिविहाराकडे पाहिले जाते.
६ डिसेंबर १९५६ साली मुंबई येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. पांजरापोळ चौकातील सी. नरसी ट्रान्स्पोर्टमध्ये निरोप आला. ही बातमी वाºयासारखी संपूर्ण शहर व जिल्ह्यात पसरली. तुकाराम (बुवा) इंगळे, केरू जाधव, अण्णासाहेब कदम, रामचंद्र जाधव, भीमराव सरवदे, एन. एस. कांबळे, लक्ष्मण आबुटे, मेसा सिद्धगणेश, दºयाप्पा जाधव, रामचंद्र रणशृंगारे, शिंदे गुरुजी आदी कार्यकर्ते मुंबईला रवाना झाले. दि. ७ डिसेंबर रोजी लाखो समाज बांधवांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अखेरचा निरोप देण्यात आला. तुकाराम (बुवा) इंगळे हे चार दिवस मुंबईतच राहिले आणि दि. ११ डिसेंबर १९५६ साली या अस्थी सकाळी ८ वाजता मद्रास मेलने मुंबईहून सोलापुरात आणण्यात आल्या.
मिरवणुकीनंतर बुधवार पेठ, मिलिंद नगर येथे कार्यकर्त्यांनी मिटिंग घेऊन ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती’ या नावाने संस्था स्थापन करण्यात आली. येथील महार वतनदार पंच ट्रस्टच्या जागेत विठ्ठल मंदिराच्या शेजारी असलेल्या बौद्धविहारात हा अस्थिकलश ठेवण्यात आला. मुंबई, नागपूरनंतर बाबासाहेबांच्या अस्थी असलेले सोलापूर हे महाराष्ट्रातील तिसरे ठिकाण आहे. मिलिंद नगरात भव्य स्मारक उभारण्यात आले आहे. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर शहर-जिल्ह्यात ज्या काही आंबेडकरी चळवळी झाल्या, त्यांची राजधानी म्हणून बुधवार पेठ, मिलिंद नगरला ओळखले जाते. हयातीमध्ये बाबासाहेबांनी या ठिकाणी भेटी दिलेल्या होत्या. त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी घेतलेली महार वतनदार परिषद महाराष्ट्रात गाजली होती. परिषदेत भविष्यातील चळवळीवर विविध ठराव करण्यात आले होते. धर्मांतराची दीक्षा घेण्याचा इशारा इथे झालेल्या परिषदेतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिला होता.
राष्ट्रीय स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार : चंदनशिवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या थोरला राजवाडा येथील अस्थिविहार प्रेरणाभूमीचा विकास करण्यात आला आहे. भीमसृष्टी आणि सोलापूरच्या भेटीतील आठवणींचा इतिहास शिल्प व छायाचित्रांच्या माध्यमातून साकारण्यात आला आहे. जवळ असलेल्या महापालिकेच्या बंद शाळेच्या जागेत राष्ट्रीय स्मारकाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी ११ कोटींचा निधी लागणार आहे. हा निधी मिळून कामाला सुरुवात होण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटणार आहोत. राष्ट्रीय स्मारकाबरोबर पर्यटनस्थळ म्हणून हा भाग विकसित करण्यावर माझा भर आहे, अशी माहिती नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.