सोलापूर जिल्ह्यातील कारी गावचा उस्मानाबाद जिल्ह्यात समावेश होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 07:53 PM2019-06-04T19:53:52+5:302019-06-04T19:56:10+5:30
ग्रामस्थांच्या प्रलंबित मागणीला मिळाले यश; फटाके वाजवून केला आनंद व्यक्त
कारी : कारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यात समाविष्ट झाल्याचे राजपत्रित अध्यादेश जाहीर झाले. यामुळे नागरिकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
कारी (ता. बार्शी) हे गाव सोलापूर जिल्ह्यात होते. भौगोलिकदृष्ट्या ते सोलापूरपासून खूप दूर होते. अनेक शासकीय कामासाठी नागरिकांची होणारी ससेहोलपट होत होती. गेल्या अनेक वर्षांपासून गावचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात होण्यासाठी नागरिकांची व ग्रामपंचायत सदस्य विजयसिंह विधाते यांची मागणी होती, परंतु शासकीयस्तरावरून कुठल्याही प्रकारची कार्यवाही होत नव्हती, असे नागरिकांना वाटत होते.
गतवर्षी जून २0१८ मध्ये राज्यपाल राजपत्रित अधिसूचना गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात होण्याबद्दल हरकत मागवली होती. हरकती कालावधीत गावाचे स्वागत करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक पक्ष व नेत्यांची मांदियाळी झाली होती, परंतु गेल्या वर्षभरापासून प्रलंबित असलेल्या मागणीला यश आले आहे. २७ मे २0१९ रोजी राज्यपाल राजपत्रित अधिसूचना जाहीर झाली असून, १ आॅगस्ट २0१९ पासून कारी (ता. बार्शी) गावाचा समावेश कारी (ता. व जि. उस्मानाबाद) असा होणारा अध्यादेश प्राप्त झाला आहे.
अध्यादेश प्राप्त
महाराष्ट्र शासन राजपत्र महसूल व वनविभागाच्या २७ मे २0१९ रोजी महाराष्ट्र जमीन महसूल सहित १९६६ क्रमांक प्राफेब २0१८ प्र. क्र. /३४ /म १0 पोट कलम (१)चे खंड चार व सहा महाराष्ट्र शासन उक्त कलम ४ नुसार केलेल्या पूर्व प्रसिद्धीनंतर कारी गावाचा समावेश उस्मानाबाद जिल्ह्यात करण्याचा आदेश महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्यासह सचिव रवीराज फले यांच्याकडून प्राप्त झाला आहे. गावात आदेश सोशल मीडियावर प्राप्त झाल्यामुळे अनेकांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला.