कृष्णा-भीमा स्थिरीकरणासह इतर सिंचन प्रकल्प मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:21 AM2021-02-14T04:21:05+5:302021-02-14T04:21:05+5:30
सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सिंचन प्रकल्पांना निधी मिळावा, या मागण्यांसंदर्भात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या ...
सध्या दिल्लीत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रातील विविध सिंचन प्रकल्पांना निधी मिळावा, या मागण्यांसंदर्भात खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली खा. शिवाचार्य महास्वामी, आ. जयकुमार गोरे, आ. राहुल कुल, आ. प्रशांत परिचारक, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. राम सातपुते, प्रशांत कोरेगावकर या भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ते, बांधकाम व परिवहन मंत्री नितीन गडकरी, रेल्वे मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली.
यावेळी पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्याच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी वरदायिनी असणाऱ्या कृष्णा-भीमा स्थिरीकरणाकडे भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असल्याने आघाडी सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने स्थिरीकरण योजना पूर्णत्वास आणण्यासाठी निधी द्यावा. नीरा उजवा कालव्याला समांतर पाईपलाईन टाकून पावसाळ्यात वाया जाणारे पाणी माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याला द्यावे. नीरा-देवधर बंदिस्त पाईपलाईनचे पाणी माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्याला मिळावे. जिहे-कठापूर योजना तत्काळ मार्गी लावून माण, खटाव तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. इंदापूर-सांगोला रस्त्यांच्या कामास मार्च अगोदर सुरवात करावी. शेतकऱ्यांना लाभदायी ठरलेल्या किसान रेल्वेच्या फेऱ्या वाढवाव्या. वरील सिंचन प्रकल्पांना तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
यावेळी चर्चेदरम्यान तिन्ही केंद्रीय मंत्र्यांनी भाजपच्या शिष्टमंडळाने केलेल्या मागण्यांची दखल घेत सकारात्मक भूमिका घेतली. या योजना पूर्णत्वास नेण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील विविध विकास कामांबाबत चर्चा झाल्याची जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी सांगितले.