दुसºयांचंही ‘घर’ असतं...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:29 PM2019-01-11T12:29:39+5:302019-01-11T12:29:55+5:30
काही म्हणा, माणसं शिकली हे खरं. प्रत्येकानं शिकायला तर हवंच, पण शिकलं म्हणजे खरंच शहाणपण येतं का हो? पदव्यांच्या ...
काही म्हणा, माणसं शिकली हे खरं. प्रत्येकानं शिकायला तर हवंच, पण शिकलं म्हणजे खरंच शहाणपण येतं का हो? पदव्यांच्या भेंडोळ्यांसोबत शहाणपणाही हवा आहे का नाही? असायलाच हवा ना! अर्थात अनेक जण शिकलेले आणि शहाणेसुरतेही आहेत म्हणा, पण काही साध्या गोष्टीत माणूस एवढा अडाणी कसा राहतो हा प्रश्न तसा कायम अनुत्तरितच राहतो बघा. छोट्या वाटणाºया पण मोठ्या असणाºया फार गोष्टी असतात हो या दुनियादारीत.
मोठ्या मोठ्या हॉटेलात पाळायचा शिष्टाचार कळतो, पण आपल्या किंवा दुसºयांच्या घरात कसे वागावं, हे मात्र कळत नाही राव यांना! हेच बघा ना, काही दिवसांपूर्वी भल्या सकाळीच एक जण माझयाकडे आला. आता एवढ्या सकाळी कुणी आलं म्हणजे काय उगीचंच येणार नाही ना? काहीतरी महत्त्वाचे काम असल्याशिवाय कोण कशाला येईल एवढ्या सकाळी. एकतर मीही भलत्याच घाईत होतो. तो आला, बसला, चहापान झाले; पण मुद्यावर काही येईनाच. दर दहा मिनिटांनी मी त्याला विचारतोय, काय विशेष? त्यावर त्याचे एकच उत्तर, ‘काही नाही.. निवांत. ‘बोलण्यासारखे सगळे विषय संपले, पण हा का आलाय ते काही सांगेना. घरी आलेल्या माणसाला का आलास?’ असंही विचारता येत नाही ना हो। तासाभराने मला थेट विचारावेच लागलं. ‘एवढ्या सकाळी काय काम काढलं?’ आळोखे पिळोखे देत तो म्हणाला, ‘काही नाही हो, निवांत आहे आज नि आपलं टाइमपास म्हणून आलोय!’ आत्ता बोला।
बरे आपल्या सवयी अन् वेळेप्रमाणेच जगानेही वागावे, असा दुराग्रह कशासाठी हो! प्रत्येकाला आपलं जीवन कसं जगायचं, आपला वेळ कसा घालवायचा याचे स्वातंत्र्य आहे ना. कुणी कधी जेवायला बसावं, कुणी कधी झोप घ्यावी हे दुसºयांनी ठरवायचं का सांगा बरे! परवा असाच माझा एक मित्र घरी आला. बायकोनं सांगितलं, आत्ताच झोपलेत, पहाटेपर्यंत काम करीत बसले होते. उठवलं तर चिडतील, बायकोनं नाही उठवलं म्हणून या पठ्ठ्यानं स्वत:च उठवलं आणि वर म्हणतो कसा, काय झोपमोड झाली नाही ना? आता याच्या पेकाटात लाथ नाही का घालावी? झोपेतून उठवतोय अन् पुन्हा झोपमोड झाली काय म्हणून विचारतोय!
राग आला असला तरी काय? शिवाय काहीतरी महत्त्वाचेच काम असल्याशिवाय असे कोण वागेल! मी त्याला विचारलं तर तो म्हणाला, ‘काही नाही हो, जरा पडावं म्हटलं तर झोपच येईना... म्हटलं चला, तुमच्याशी गप्पा मारत बसावं, हंऽ हॅऽ!’ तुम्हीच सांगा, याला पायताणानं नाही का हो मारावं? एक शेजारी तर असा काही भेटला मला, बाप रे! सकाळची घाईगडबड.. आॅफिसला जाण्याची माझी घाई अन् हा शेजारी भल्या सकाळी टपकणारच. ‘पेपर आला का नाही हो अजून?’ असं विचारत दारात पडलेलं वर्तमानपत्र उचलून थेट घरात येणार अन् निवांत वाचत बसणार, रोजचंच हे. फुकटात पेपर वाचायचा अन् वर आमच्याबरोबर चहा नाष्टाही भागायचा त्याचा. सगळं झालं तरी उठायचं नाव नाही घ्यायचा हा. शेवटी एकेदिवशी त्याची जागा दाखवायची पाळी आलीच. दुसºयाच्या घरी कधी जावं, किती वेळ थांबावं, याचा काहीच ताळमेळ कसा नसतो हो यांना? मग काय, यांना ही थुंकण्याचीच जागा वाटते. यांना काही बोलावं तर ते आधीचीच ‘चित्रकला’ दाखवितात. प्रत्येक नमुना वेगळाच हो! काही वाटत नाही यांना. असाच एक नमुना! भर उन्हात आला म्हणून त्याला थंड पाणी दिलं.
एक घोट पिताच तांब्या बाजूला ठेवून म्हणाला, ‘फिल्टरचं पाणी नाही वाटतं.., साधा फिल्टर नाही तुमच्याकडे? कितीही राग आला तरी गिळावा लागतो हो! माझ्या एका मित्राकडे नेहमी येणाºयांचा तर प्रताप काही औरच. घरातला समजून त्याच्यासमोर सगळे बोलायचे. चहापान करायचे. एकदा यालाच चहा करायला घरात साखर नव्हती. बहाद्दरानं गावभर केलं. मित्र विचारायला लागले, ‘एकाएकी एवढी वाईट परिस्थिती कशी आली हो?’ रोज वेगळे नमुने अनुभवायला मिळतात या दुनियादारीत. तुमच्या घरात तुम्ही कसेही वागा हो, पण इतरांचेही घरपण जपा, दुसºयांचंही ‘घर’ असतं..!
- अशोक गोडगे-कदम
(लेखक हे साहित्यिक आहेत)