औज बंधारा भरला फुकटात, सोलापूर महापालिकेचे पाण्याचे ७ कोटी वाचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:22 PM2018-08-23T13:22:31+5:302018-08-23T13:27:32+5:30
सोलापूर : वीर धरणातून भीमेत आलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे औज व चिंचपूर बंधारे भरून ओव्हरफ्लो झाल्यामुळे सोलापूर महापालिकेची साडेसात कोटी रुपये पाणीपट्टी वाचली आहे. सातारा जिल्ह्यातील भाटघर, देवधर, वीर धरणे शंभर टक्के भरल्यामुळे भीमा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. १५ आॅगस्ट रोजी वीर धरणातून नीरेत सोडलेले पाणी १९ आॅगस्ट रोजी सकाळी औज बंधाºयात पोहोचले. त्यानंतर २0 आॅगस्ट रोजी सकाळी औज बंधारा सव्वाचार मीटरने भरून चिंचपूर बंधाºयाकडे पाणी वाहू लागले. २१ आॅगस्ट चिंचपूर बंधारा भरून पाणी कोर्सेगावकडे वाहू लागले.
औज व चिंचपूर बंधारे क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत आहेत. अद्याप भीमेतून प्रवाह सुरूच आहे. वीर धरणातून पाणी येण्याअगोदर औज बंधारा कोरडा झाला होता. चिंचपूर बंधाºयात अवघ्या २0 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक होता. त्यामुळे सोलापूरच्या पाणीपुरवठ्यासाठी उजनीतून पाणी सोडावे लागणार होते.
उजनीतून पाणी सोडले असते तर महापालिकेला पाटबंधारे विभागाची साडेसात कोटी पाणीपट्टी लागू झाली असती. पण निसर्गाने तारल्यामुळे महापालिकेचा फायदा झाला आहे. आता नोव्हेंबरपर्यंतची पाण्याची चिंता मिटली आहे. या दरम्यान आणखी पाऊस झाला तर चालूवर्षी केवळ तीन पाळ्यातून उजनीतून पाणी घ्यावे लागेल. यामुळे महापालिकेची पाणीपट्टी मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.
हिप्परगा तलाव मात्र मायनसवर
- उजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. औज व चिंचपूर बंधारे भरले आहेत; मात्र हिप्परगा तलाव मायनसमध्ये आहे. या परिसरात पाऊस नसल्यामुळे गेल्या चार महिन्यात पंपिंग करून केवळ पाच एमएलडी पाणी उचलले जात आहे. सद्यस्थितीत उत्तर व तुळजापूर तालुक्यात दमदार पाऊस होऊन हिप्परगा तलाव प्लसमध्ये आल्यास सोलापूरला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.