हीच आमची आषाढी वारी.. घे मानुनि पांडुरंगा आता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:27+5:302021-07-07T04:27:27+5:30
आषाढी यात्रा सोहळ्याला श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येता येणार नाही म्हणून योगिनी एकादशीलाच शेकडो वारकरी भाविकांनी आषाढी वारी ...
आषाढी यात्रा सोहळ्याला श्री विठ्ठल व रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येता येणार नाही म्हणून योगिनी एकादशीलाच शेकडो वारकरी भाविकांनी आषाढी वारी पोहोचविण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी केली.
योगिनी एकादशीचे वारकरी संप्रदायात तसे फारसे महत्त्व नसले तरी अनेक भाविक १५ दिवसांची व महिन्याची एकादशी न चुकता पंढरपूरला वारी पोहोच करण्यासाठी येतात. मागीलवर्षीप्रमाणे यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आषाढी यात्रा सोहळा रद्द करून तो प्रातिनिधिक स्वरूपात करण्याचा निर्णय प्रशासनाकडून जाहीर केला आहे. त्यामुळे मानाच्या १० पालख्या वगळता इतर सर्व पालख्या भाविकांना पंढरपुरात येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्या धर्तीवर १७ ते २५ जुलैपर्यंत पंढरपुरात कडक संचारबंदीचा आदेशही काढण्यात आला आहे. यामुळे अनेकांनी हीच आपुली आषाढी वारी समजून पांडुरंगाचे मनोमन दर्शन घेतले.
---
भाविकांनी वाळवंट फुुलले
सोमवारी पार पडलेल्या योगिनी एकादशीलाच आषाढीची एकादशी समजून पंढरपूर तालुक्यातील भाविकांसह इतर जिल्ह्यांतील भाविकांनीही श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपुरात हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ओस पडलेले चंद्रभागेचे वाळवंट, मंदिर परिसरात भाविकांची गर्दी दिसून आली.
---
व्यावसायिकांना दिलासा
भाविकांच्या गर्दीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या व्यावसायिकांनाही काहीसा दिलासा मिळाला. अनेक भाविक आषाढी यात्रा सोहळा पोहोच केला, असे समजून प्रसादाचे साहित्य, कुंकू-बुक्का, पेढे, तुळशी माळ, विठ्ठलाचे फोटो खरेदी करताना दिसून आले.
मंदिर परिसरात सेल्फी
दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंदिरात प्रवेश बंद असला तरी बाहेरूनच कळसाचे व नामदेव पायरीचे दर्शन घेऊन समाधान मानले. काहीजण अनेक दिवसांनी पंढरपूरला आल्याने मंदिर परिसरात सेल्फी काढण्यात मग्न असल्याचेही दिसून आले.