जमीन आमची गेली मात्र पाणी ठरले आहे मृगजळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:23 AM2021-04-28T04:23:20+5:302021-04-28T04:23:20+5:30
करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. ...
करमाळा : उजनी धरण निर्मितीसाठी करमाळा तालुक्यातील २९ गावे, हजारो हेक्टर सुपीक शेतजमीन, मंदिरे, घरे, मोठे वाडे पाण्याखाली बुडाले. तेव्हा उजनीचे धरण साकारले. उजनी धरणातील पाणी प्राधान्याने करमाळा तालुक्यास मिळायला हवे. पण उजनीचे पाणी करमाळ्यास मृगजळच ठरले आहे. धरणातील पाणी मराठवाडयाला जातेय. आता इंदापूरला नेण्याचा घाट घातलाय पण धरण निर्मितीसाठी त्याग केलेला करमाळा तालुका अद्याप तहानलेलाच आहे.
उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यातील शेतीला सांडपाण्याच्या नावाखाली पळवण्याचा घाट घातला गेला असून, तसा प्रशासकीय आदेश जलसंपदा विभागाने काढला आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांमधून संतापाची भावना निर्माण झाली आहे. उजनीचे धरण स्व. नामदेवराव जगताप यांच्या मागणीवरून स्व. यशवंतराव चव्हाण यांनी करमाळा तालुक्याच्या सीमेवर बांधले. धरण निर्मितीसाठी सर्वात मोठा त्याग करमाळा तालुक्याचा आहे. प्राधान्यक्रमाने करमाळा तालुक्यास या उजनी धरणातील पाण्याचा लाभ मिळणे अपेक्षित असताना करमाळा तालुक्यातील पश्चिम भाग वगळता तालुक्यातील संपूर्ण ७५ टक्के भाग धरणाच्या पाण्यापासून वंचित आहे.
-----
धरण उशाला कोरड घशाला..
उजनी धरणातील पाणी दोनशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मराठवाड्याला चाललेय पण हाकेच्या अंतरावर असलेल्या करमाळा तालुक्याच्या नशिबी उजनीचे पाणी अद्याप नाही. करमाळा तालुक्याच्या उशाला उजनीचे धरण असताना येथील शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. उजनी धरणातून १० हजार ५०० हेक्टर क्षेत्राला पाणी देणारी दहिगाव उपसा सिंचन योजना अर्धवट आहे. धरणापासून १५ किलोमीटर अंतरावर असलेला वडशिवणे तलाव कोरडा ठणठणीत आहे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजना कागदावर आहे.
२७ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणाऱ्या कुकडी प्रकल्पाचे पाणी प्रत्येक वर्षी आंदोलनाशिवाय मिळतच नाही. कालव्यातून पाणी मिळत असल्याने ‘टेल टू हेड’ चा नियम पाळला जात नाही. तालुक्यातील पूर्व भागातील गावांना पिण्याचे पाणी सुध्दा मिळालेले नाही. त्यामुळे प्रत्येक वर्षी उन्हाळयात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. ज्या तालुक्याने उजनीसाठी त्याग केला त्या करमाळा तालुक्यातील शेती व पिण्यास प्राधान्याने पाणी द्यावे, अशी मागणी आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार नारायण पाटील, जयंवतराव जगताप, दिग्विजय बागल या नेते मंडळीसह सर्वच पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी केली आहे.
-----