'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली

By महेश गलांडे | Published: February 7, 2019 08:27 PM2019-02-07T20:27:03+5:302019-02-07T21:19:29+5:30

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले.

'Our son got big officer', poor farmer son cracked Examof UPSC | 'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली

'आमचा मुलगा मोठा सायब झाला', बँडमधील वाजंत्र्याच्या पोरानं UPSC क्रॅक केली

googlenewsNext

सोलापूर - जिल्ह्याच्या बार्शी तालुक्यातील 8-10 हजार लोकसंख्या असलेल्या गावातील जीवन मोहन दगडे याने युपीएससी परीक्षा क्रॅक केली. गुरुवारी दुपारी 1 वाजता जीवनच्या वडिलांना ही बातमी समजली, त्यावेळी वडील मोहन दगडे हे वैराग येथील बँड पथकात कामावर होते. आपला पोरगा आणखी मोठा सायंब झाल्याचं समजताच, त्यांनी तातडीनं सुर्डी गाव गाठलं. गावात पाऊल ठेवण्यापूर्वीच गावकऱ्यांनी मोहन दगडेंवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला. पोरानं मिळवलेलं हे यश पाहून मोहन दगडे भारावून गेले होते. 

बार्शी तालुक्यातील सुर्डी गावच्या जीवन दगडे याने युपीएससीच्या इंडियन फॉरेस्ट सर्व्हीस (आयएफएस) परीक्षेत देशात 56 वी रँक मिळवत घवघवीत यश संपादन केले. वैरागच्या अमर बँड पथकात कलाट हे वाद्य वाजविणाऱ्या पोरानं मिळवलेल्या या यशानंतर जीवन आणि दगडे कुटुंबीयांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. तर, आमचा मुलगा आणखी मोठा सायब झालाय, अशी केविलवाणी प्रतिक्रिया जीवनच्या वडिलांनी लोकमतशी बोलताना दिली. गेल्या 25 वर्षापासून मी वाजवत असलेल्या बँडचं आज कुठंतरी सार्थक झालं, आमच्या पोरानं आमच्या कष्टाचं चीझ केलं. आमचं पांग फिटलं, असेही जीवनच्या वडिलांनी म्हटले. तसेच, गावातल्या पोरांना त्या इंटरनेट अन् व्हाट्सापवरनं जीवन पास झाल्याचं समजलं, मग मला गावातूनच फोन आला अन् मी पळतच सुर्डीला आलो. दुपारी गावात पोहोचल्यानंतर गावातील सगळी मंडळी आम्हाला भेटायला येत होती. मलापण लै आनंद झाला होता, मग मी आणि जीवनच्या आईनं आपल्या पावण्या-रावळ्यांना फोन करुन सांगितल. सगळ्यांनाच लई आनंद झाला बघा. 

मग, आम्ही गावात पेढे वाटले, त्यानंतर आमचं कुळदैवत असलेल्या गावातील भैरोबाला नारळ फोडून पेढे वाटून आनंद साजरा केला. पोराला कधीही गरिबीची जाणीव नं होऊ देता आम्ही शिकवलं, पोरानंही आमच्या कष्टाचं जीच केल्याचं मोहन दगडे यांनी लोकमतशी बोलताना म्हटलं. तर, यापुढे बँड वाजवणं बंद करणार का, असा प्रश्न विचारला असता. हे.. हे... आवं अजून दोन पोरं शिकत्याती, एक औरंगाबादला आणि एक पुण्याला असतोय. त्या दोघांनाबी साहेब बनविल्याशिवाय बँड सोडायचा नाही, असं भावूक उत्तर मोहन यांनी दिली. जीवनला दोन भाऊ असून अभिजीत हा औरंगाबादमध्ये तर महेश पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करत आहेत. या दोन्ही मुलांनाही अधिकारी बनविण्याचं स्वप्न जीवनच्या आई-वडिलांनी बाळगलं आहे.     

युपीएससी उत्तीर्ण जीवनचे वडिल, मोहन दगडे गेल्या 25 वर्षांपासून वैराग येथील बँडवाल्या पठाण यांच्या अमर बँडमध्ये काम करतात. या बँड पथकात ते 'कलाटी' हे वाद्य वाजवतात. तर, जीवनची आई बचत गटांचं काम बघते. अत्यंत हालाखीच्या, गरिबीच्या परिस्थितीतून या माय-बापानं आपल्या तिन्ही पोरांना उत्तम शिक्षण दिलं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीही कच खाल्ली नाही. त्यामुळेच आजचा अत्यानंद देणारा दिवस पाहायला मिळाला.

जीवन लहानपणापासूनच शाळेत हुशार होता. घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे इयत्ता पहिले ते पाचवीपर्यंतचे त्याचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतच पूर्ण झाले. त्यानंतर, गावातीलच दिलीपराव सोपल विद्यालयात दहावीपर्यंतचे शिक्षण त्याने पूर्ण केले. त्यानंतर 11 वी आणि 12 वीसाठी सोलापूर येथील दयानंद महाविद्यालयात जीवनने प्रवेश घेतला. बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर थेट पुणे गाठले, पुणे विद्यापीठातून बीएस्सीची पदवी पूर्ण करतानाच, जीवनने एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास सुरू केला होता. बीएससीची परीक्षा पास केल्यानंतर सन 2016 मध्ये जीवनने FRO (Forest Range Officer) क्लास 2 ची परीक्षा उत्तीर्ण केली. अर्थातच, घरची बेताची परिस्थिती लक्षात घेऊन त्याने उत्तराखंड येथे जॉईन केलं. मात्र, जीवनला क्लास वन अधिकाऱ्याची पोस्ट स्वस्थ बसू देत नव्हती. जिल्हाधिकारी व्हायचं त्याचं स्पप्न, नेहमीच त्याला खुणवत असे. त्यामुळे FRO च्या नोकरीत मेडिकल रजा टाकून जीवनने दिल्लीत युपीएससीची पुन्हा तयारी सुरू केली. अखेर, आई-वडिलांच्या कष्टाचं आणि जीवनने अभ्यासासाठी घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला आयएफएस परीक्षा पास होवून मिळालं. ज्या दिवशी जीवनच्या आयएसएफ परीक्षेचा निकाल वेबसाईटवर झळकला, त्यादिवशी तो कर्नाटकच्या धारवाड येथे आपल्या FRO च्या नोकरीतील ट्रेनिंगसाठी नुकताच जाईन झाला होता. 12 डिसेंबर 2018 रोजी युपीएससीची परीक्षा दिल्यानंतर 06 फेब्रुवारी 2019 हा निकालाचा दिवस जीवनच्या आणि दगडे कुटुबीयांच्या आयुष्यात मैलाचा दगड ठरला आहे.  

दरम्यान, जीवनच्या या यशाबद्दल सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी फोन आणि मेसेजद्वारे दगडे कुटुबीयांचे अभिनंदन केले आहे. 
 

Web Title: 'Our son got big officer', poor farmer son cracked Examof UPSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.