मनपाच्या १६ पैकी ११ सर्वसाधारण सभा तहकूब, सोलापूर शहराच्या विकासावर परिणाम, विरोधक हतबल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 01:09 PM2017-11-18T13:09:27+5:302017-11-18T13:10:18+5:30
सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला असून, आजवर घेण्यात आलेल्या एकूण १६ सर्वसाधारण सभांपैकी ११ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : सोलापूर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होऊन ९ महिन्यांचा कालावधी उलटला असून, आजवर घेण्यात आलेल्या एकूण १६ सर्वसाधारण सभांपैकी ११ सभा तहकूब करण्यात आल्या आहेत. महापौरांची निवड व अन्य चार अशा फक्त पाच सर्वसाधारण सभा पूर्ण झाल्याने शहराच्या विकासावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या प्रकारामुळे सध्या विरोधक मात्र हतबल झाले आहेत.
सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर सर्वात जास्त नगरसेवक असलेल्या भारतीय जनता पार्टीने सत्ता स्थापन केली. दि. ८ मार्च २0१७ रोजी महापौर निवडीची सर्वसाधारण सभा पार पडली. नूतन महापौरांच्या अध्यक्षतेखाली दि.२0 एप्रिल २0१७ रोजी दुसरी सर्वसाधारण सभा बोलावण्यात आली. या सभेत फक्त दोन विषय घेऊन ती तहकूब करण्यात आली. तीच सभा पुढे दि.५ जुलै २0१७ रोजी घेण्यात आली ती पूर्ण झाली. दि.१९ मे २0१७ रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात आलेली सभा तहकूब करण्यात आली. याच दिवशी सायंकाळी ४.३0 वाजता मागील तहकूब सभा घेण्यात आली; मात्र सभेतील विषयाला तीन महिने पूर्ण झाल्याने सर्व प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवण्यात आले. दि.२0 जून २0१७ रोजी घेण्यात आलेली सभाही तहकूब झाली ती पुढे दि.१२ सप्टेंबर रोजी घेण्यात आली ती पूर्णपणे पार पडली.
-----------------
नगरसेवकांमधून तीव्र नाराजी...
- महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा ही अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये धोरणात्मक निर्णय होत असतात. सध्या ७0 टक्के नगरसेवक नवीन आहेत. झोन रचना प्रलंबित असल्याने अनेक अडचणी निर्माण होत आहेत. आठ महिन्यात फक्त एका सभेत सर्व विषय घेण्यात आले आहेत. एका सभेच्या विषयाला तीन महिन्याचा कालावधी पूर्ण झाला तर कायद्याने सर्व अधिकार हे प्रशासनाकडे जातात. सभेचे हक्क हिरावून घेतले जातात. यापूर्वीच्या काळात इतक्या सर्वसाधारण सभा कधीही तहकूब झाल्या नाहीत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नगरसेवक अॅड. यु.एन.बेरिया यांनी व्यक्त केली.
-----------------
दि.१ जुलै २0१७ रोजी घेण्यात आलेली सभा देखील तहकूब झाली ती दि.५ जुलै २0१७ रोजी पूर्ण झाली. दि.१९ आॅगस्ट रोजी बोलावण्यात आलेली सर्वसाधारण सभा पूर्णपणे पार पडली. त्यानंतर दि.२0 जुलै २0१७ रोजी तहकूब झालेली सभा दि.१२ सप्टेंबर रोजी पूर्ण पार पडली. दि.१३ आॅक्टोबर २0१७ व दि.१७ नोव्हेंबर २0१७ रोजी बोलावण्यात आलेल्या दोन्ही सभा या तहकूब करण्यात आल्या आहेत. भाजपाच्या सत्ता स्थापनेनंतर आजतागायत झालेल्या १६ पैकी फक्त पाच सर्वसाधारण सभा या पूर्णपणे पार पडल्या आहेत तर ११ सभा या दुखवट्याच्या व अन्य कारणास्तव तहकूब करण्यात आल्या आहेत.
------------------
- सत्ताधारी भारतीय जनता पार्टीला सर्वसाधारण सभा चालवता येत नाही. दोन मंत्र्यांच्या गटबाजीमुळे सोलापूरचे मोठे नुकसान होत आहे. शहरात अनेक समस्या आहेत, जनतेमधून ओरड होत आहे. नगरसेवक म्हणून काम करणे कठीण झाले आहे. अशी प्रतिक्रिया एआयएमआयएमचे नगरसेवक तौफिक शेख यांनी व्यक्त केली.
- वारंवार सभा तहकूब होत असल्याने शहराच्या विकासाचा आलेख कमी होत चालला आहे. सत्तेतील भाजपाचा प्रशासनावर अंकुश राहिला नाही. शहराच्या विकासाचे प्रश्न मोडीत काढण्याचे काम सत्तेमध्ये असलेल्या दोन मंत्र्यांकडुन होत आहे. दोन मंत्र्यांची गटबाजी शहराच्या विकासाला मारक ठरत आहे अशी प्रतिक्रिया बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी दिली.
- आम्ही नवीन नगरसेवक आहोत, महापालिकेचे कामकाज समजण्यासाठी किमान दोन सर्वसाधारण सभा या चांगल्या चालल्या पाहिजेत. नगरसेवक होऊन ९ महिने झाले तरी एक रुपयाचे काम करता आले नाही. आजवरच्या काळातील सर्वात वाईट कारभार सध्या पाहावयास मिळत आहे. तब्बल तीन महिने उशिरा सादर झालेल्या बजेटवर अद्याप फक्त अभिप्राय देण्याचे काम सुरू आहे अशी माहिती शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी दिली.