ऊसतोड मजुरांच्या वस्तीत ६० टक्के मुले शाळाबाह्यच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 08:23 PM2018-12-26T20:23:48+5:302018-12-26T20:26:15+5:30

गोपालकृष्ण मांडवकर सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कुंभारी रोडवरील वस्तीमधील सुमारे सव्वाशे झोपड्यांमध्ये १४ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील जवळपास ...

Out of the 60 percent of the under-farm laborers, children are out of school | ऊसतोड मजुरांच्या वस्तीत ६० टक्के मुले शाळाबाह्यच

ऊसतोड मजुरांच्या वस्तीत ६० टक्के मुले शाळाबाह्यच

Next
ठळक मुद्दे कुणी हुंदडतात वस्तीत, तर कुणी होतात आईबापांचा आधारहे वय शाळेत जाण्याचे ! तरी येथील फक्त २६ मुलेच शाळेत जातात

गोपालकृष्ण मांडवकर

सोलापूर : सिद्धेश्वर कारखान्यावर आलेल्या ऊसतोड मजुरांच्या कुंभारी रोडवरील वस्तीमधील सुमारे सव्वाशे झोपड्यांमध्ये १४ वर्षांपर्यंतच्या वयोगटातील जवळपास ७० मुले आहेत. हे वय शाळेत जाण्याचे ! तरी येथील फक्त २६ मुलेच शाळेत जातात. इतर सारी मुले एक तर वस्तीमध्ये दिवसभर हुंदडतात किंवा रानात जाऊन आईवडिलांना ऊस तोडणीच्या कामात मदत करतात. मुलांनी शाळेत जावे, अशी अनेकांच्या पालकांची इच्छा असली तरी शाळेऐवजी बाहेर भटकण्यात किंवा रानात मन रमत असल्याने मुले हाकेच्या अंतरावर असलेली शाळा टाळत असल्याचे उदासवाणे चित्र या वस्तीमध्ये आहे.

कुंभारी रोडवरील सिद्धेश्वर प्रशालेमध्ये दहावीपर्यंचे वर्ग आहेत. या शाळेच्या जवळच सरकारने १९९६ मध्ये ज्ञानप्रबोधिनीच्या सहकार्याने साखर शाळेसाठी इमारत बांधली. मात्र विद्यार्थीच नसल्याने सध्या ही इमारत सिद्धेश्वर शाळेच्या वापरात आहे. ऊसतोड मजुरांच्या वस्तीवरील ७० पैकी फक्त २६ मुलांनीच सिद्धेश्वर शाळेत नाव दाखल केले आहे. 

पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवीमध्ये प्रत्येकी १३ मुलांची नावे दाखल आहेत. पुस्तके, गणवेश मिळतो असे सांगूनही मुले शाळेकडे फिरकतच नसल्याने पालकही त्रस्त आहेत. अनेक मुलांची नावे गावाकडच्या शाळेत दाखल असली तरी वस्तीवर राहायला आल्यापासून त्यांनी पाटीपुस्तकांकडे पाठ फिरवली आहे. सप्टेंबरपासून आलेल्या या कुटुंबांचा मुक्काम फेब्रुवारी-मार्चपर्यंत येथेच राहणार आहे. त्यामुळे कि मान सहा महिने या मुलांची शाळा बुडणार आहे. 

अनेक मुलेमुली आपल्या आईबाबांना मदत करतात. भावंडांना सांभाळणे, रानात मदत करावी लागणे, गुरे सांभाळणे, झोपडी राखावी लागणे अशा त्यांच्या सबबी आहेत. पिंपळदरीची १३ वर्षाची पूजा शाळेला जातच नाही. सहा वर्षाच्या विश्वजितलाही शाळेपेक्षा रानाचा मोह अधिक आहे. 

कावळ्याची वाडी (बीड) या गावातील शाळेत पाचवीत शिकणारा दत्ता येथे शाळेत जातच नाही.  नगर जिल्ह्यातील जामखेड येथील रामेश्वरी गावच्या शाळेत दुसºया इयत्तेत असली तरी येथे शाळेच्या नावाने भोकाड पसरते. जीवन कांबळे यांची श्रुती आणि गणेश ही आठ वर्षांची जुळी मुलेही शाळा नको म्हणतात. मुलांना मारपीट करून शाळेत पाठवावे तर आपल्या पश्चात ही मुले कुठे निघून गेली तर.., ही भीती पालकांना आहे. त्यामुळे पालकांचाही नाईलाज आहे. 

दत्तात्रयला इंजेक्शनमुळे आली होती रिअ‍ॅक्शन
- दत्तात्रय त्र्यंबक मुंडे हा केज (बीड) मध्ये राहणारा मुलगा. त्याने सिद्धेश्वर शाळेत सहाव्या वर्गात प्रवेश घेतला आहे. मागील आठवड्यात झालेल्या लसीकरण मोहिमेत त्याला रुबेलाचे इंजेक्शन दिले. मात्र रात्री त्याचे सांधे पार अखडून गेले. हलताही येईना. शरीर ताठ झाले. अखेर रात्रीच्या अंधारात त्याला शहरातील दवाखान्यात नेले, दोन दिवसांनी तो बरा झाला. मात्र आईवडिलांची मजुरी आणि त्याची शाळाही बुडाली. 

नव्या मैत्रिणी
- वस्तीवर आपल्या आईवडिलांसोबत आलेली ऋतुजा चोले पाचवीला आहे. तिला सिद्धेश्वर शाळेत नाव दाखल केल्याने आता नव्या मैत्रिणी मिळाल्या आहेत. भाग्यश्री हिरेमठ, श्रावणी चंद्राळ, आचल सरोज या तिच्या सोलापूर जिल्ह्यातील नव्या मैत्रिणी आहेत. मैत्रिणींची शाळेची वाट वस्तीवरून जाते. अशा वेळी ऋतुजा त्यांना ताजा गोड ऊस खायला देते. 

तुम्ही घ्यायला येत नाही? 
- बीड जिल्ह्यातील करचोंडी येथील सहा वर्षाचा चुणचुणीत राजकुमार बाबू वायकर याच्या प्रश्नाने अनुत्तरित केले. शाळेत का जात नाही, असे विचारले असता तुम्ही घ्यायलाच येत नाही, असा त्याचा प्रतिप्रश्न होता. त्याचा हा प्रश्न म्हणजे शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करून निव्वळ आकडेवारी सांगणाºया तथाकथित समाजसेवकांसाठी चपराकच आहे.

Web Title: Out of the 60 percent of the under-farm laborers, children are out of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.