कोरोनाबाधित ९५ पैकी १६ गावांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:17 AM2021-05-29T04:17:57+5:302021-05-29T04:17:57+5:30

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. पंढरपूर तालुक्यात पहिला रुग्ण उपरीत सापडला. दीड वर्षात पंढरपूर तालुक्यातील एखाद दुसरं गाव, ...

Out of 95 villages affected by Corona, 16 villages were defeated by Corona | कोरोनाबाधित ९५ पैकी १६ गावांची कोरोनावर मात

कोरोनाबाधित ९५ पैकी १६ गावांची कोरोनावर मात

Next

दीड वर्षापासून कोरोनाचे संकट घोंगावत आहे. पंढरपूर तालुक्यात पहिला रुग्ण उपरीत सापडला. दीड वर्षात पंढरपूर तालुक्यातील एखाद दुसरं गाव, वाडीवस्तीवगळता प्रत्येक गावात पोहोचला होता. त्यामुळे भीतीचे वातावरण होते. अशातच दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव सुरू झाला आणि पुन्हा हाहाकार सुरू झाला. पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेत तालुक्यात दुपटीने जीवितहानी झाली. राजकीय, सामाजिक, शैक्षिणक क्षेत्रातील अनेकांना आपला जीव गमवावा लागला.

पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत संसर्ग तिप्पट, चौपट वेगाने वाढत असल्याने अनेक गावांमध्ये १०० पेक्षा जास्त रुग्ण झाले. तालुक्यात वाखरी, गादेगाव, खेडभोसे, करकंब, देवडे, सुस्ते, अजनसोंड, कासेगाव, लक्ष्मीटाकळी आदी गावांमध्ये जवळपास ३०० ते ५०० च्या दरम्यान रुग्ण वाढल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढत होती. आरोग्याच्या सुविधा न मिळाल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. त्यानंतर गतवर्षीप्रमाणेच यावर्षीही प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी आपली वैद्यकीय रजा असतानाही १५ दिवस अगोदर कामावर रुजू होत कोरोना लढ्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्यांनी तहसीलदार सुशील बेल्हेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासह तालुक्यातील कोरोना वॉरियर्सना सोबत घेऊन पंढरपूर शहर व तालुक्यात कोरोनामुक्तीचा लढा नव्याने उभारला.

गावागावांमध्ये मोठ्या ग्रामपंचायती, उद्योगपती व लोकवर्गणीतून स्वतंत्र कोविड सेंटर उभारून पंढरपूर शहरातील आरोग्य सुविधांवर पडणारा भार कमी केला. विलगीकरण कक्ष, मोकाट फिरणाऱ्यांवर कारवाई, व्यापाऱ्यांच्या तपासण्या वाढवून वाढणारा संसर्ग आटोक्यात आणण्यात यश मिळविले आहे.

----

ही गावे झाली कोरोनामुक्त

प्रशासनाने केलेल्या या उपाययोजनेमुळे अंजनसोंड, बादलकोट, तरटगाव, करोळे, कान्हापुरी, देवडे, केसकरवाडी, शेंडगेवाडी, वाडीकुरोली, चिचुंबे, कोंढारकी, नेमतवाडी, नांदुरे, उंबरे, मेंढापूर, चिलाईवाडी, तनाळी आदी १६ गावे १०० टक्के कोरोनामुक्त झाली आहेत. तर बार्डी, जळोली, पेहे, आव्हे, शेवते, भोसे, खेडभोसे, उपरी, जैनवाडी, सुपली, धोंडेवाडी, गार्डी, लोणारवाडी, ईश्वरवठार, नारायण चिंचोली, एकलासपूर, सिद्धेवाडी, शिरगाव, अनवली, शेटफळ, नळी, पोहोरगाव, पुळूजवाडी, नेपतगाव, विटे, शेगाव दुमाला, बाभूळगाव आदी २६ गावांमध्ये दोन ते चार ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे ही गावेही जवळपास १०० टक्के कोरोनामुक्त होतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

----------

गृहविलगीकरणातील रुग्ण कोविड सेंटरमध्ये हलविले

गृहविलगीकरणातील बाधित रुग्ण प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हे रुग्ण घरात, गावात खुलेआम वावरत असल्याने घरच्याघरी बाधित होण्याचे प्रमाण वाढत होते. गावात एकाचे अनेक रुग्ण होत असल्याने प्रशासनाने त्यांना घरात न ठेवता कोविड सेंटरला हलविले. याचाही फायदा होत आहे.

---

प्रशासनाने केलेल्या एकत्रित नियोजनामुळे पंढरपूर तालुक्यात वाढत जाणारा कोरोनाचा आकडा आटोक्यात आणण्यात यश मिळत आहे. तरीही, नागरिकांनी गाफील न राहता प्रशासनाने घालून दिलेले नियम पाळावेत. गृहविलगीकरणात न राहता कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन कोरोनामुक्त व्हावे. १००० पेक्षा जास्त कोविडचे बेड उपलब्ध आहेत. लोकांनी न घाबरता प्रशासनाला सहकार्य केल्यास हा लढा आपण आणखी गतीने जिंकू.

- सचिन ढोलेे, प्रांताधिकारी, पंढरपूर

Web Title: Out of 95 villages affected by Corona, 16 villages were defeated by Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.