आकर्षक क्रमांकातून मिळाले सोलापूर आरटीओला २२ लाखांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 05:28 PM2019-04-23T17:28:22+5:302019-04-23T17:31:30+5:30
वाहनांची संख्या सव्वानऊ लाखांवर; एका महिन्यात २९८ जणांची क्रमांकाला पसंती
सोलापूर : मार्च महिन्यात २९८ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांकापोटी आरटीओ कार्यालयाला २२ लाख ४६ हजार शुल्क जमा केले आहे.
अलीकडच्या काळात आकर्षक क्रमांकाला वाहनधारकांची पसंती वाढली आहे. त्यामुळे शासनाने उत्पन्नवाढीसाठी आकर्षक क्रमांकास शुल्क आकारले आहे.
केवळ मार्च महिन्यात २९८ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घेतले.तीन हजारांपासून तीन लाखांपर्यंत आकर्षक क्रमांकांना शुल्क आकारले जाते. ३ लाख भरून आत्तापर्यंत कोणी वाहनांसाठी नंबर घेतलेला नाही. क्रमांक एकसाठी दुचाकी वाहन मालिकेतून चार चाकीसाठी क्रमांक घेताना इतके शुल्क आकारले जाते.
वाहनधारकांनी पुढीलप्रमाणे शुल्क आकारून क्रमांक घेतले आहेत. दीड लाख : १, सत्तर हजार : १, पन्नास हजार : २, पंचेचाळीस हजार: ३, साडेबावीस हजार: १४, वीस हजार: १, पंधरा हजार: १८, साडेसात हजार: २८, पाच हजार: ७२, चार हजार: ७९, तीन हजार: ७0. अशा प्रकारे दरमहा आरटीओ कार्यालयास आकर्षक क्रमांकातून महसूल जमा होत आहे. दुचाकी व चार चाकीसाठी आकर्षक क्रमांकांना मागणी आहे.
उपप्रादेशिक परिवहनकडे मार्चअखेर एकूण वाहनांची नोंद ९ लाख २६ हजार ८३९ इतकी झाली आहे. यात मोटरसायकल: ६ लाख ४ हजार १८, स्कूटर: ७९ हजार ३८८ आणि मोपेड : ७३ हजार ४0९ अशी दुचाकी वाहनांची संख्या ७ लाख ५६ हजार ८१५ इतकी झाली आहे. त्या खालोखाल इतर वाहनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. कार : ४६ हजार ५८८,जीप : १५ हजार ५१९, टॅक्सी कॅब : २ हजार ५९६, आॅटो रिक्षा : १८ हजार १९५, स्टेज कॅरेज: ३२५, स्कूल बस: ७९६, अॅम्बुलन्स: २७४, ट्रक: ११ हजार ९९१, ट्रॅक्टर: २८ हजार ११६, फोर व्हिलर डिलिव्हरी व्हॅन: १८ हजार ६२६, थ्री व्हीलर : ९ हजार ३७, ट्रेलर : १५ हजार ८५७.
स्क्रीनवर पाहण्याची सोय : संजय डोळे
- दुचाकी व चारचाकी वाहनांना आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढली आहे. काहीवेळा एकाच क्रमांकासाठी दोनपेक्षा जास्त जणांची पसंती येते. अशावेळी लिलाव काढण्याची वेळ येते. वाद टाळण्यासाठी शिल्लक क्रमांक स्क्रिनवर पाहण्याची सोय केली आहे, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय डोळे यांनी सांगितले.