भाजप नेत्यांची वाहने बाहेर; राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या गाड्या आत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 02:28 PM2019-04-04T14:28:39+5:302019-04-04T14:34:28+5:30
विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सोलापूर शहर पोलिसांनी कशी काय नियमात सूट दिली, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बराच काळ रंगली होती.
सोलापूर : माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची गाडी पोलिसांनी थेट निवडणूक कार्यालयापर्यंत सोडली. यामुळे सत्ताधारी भाजपचे नेतेही काहीकाळ दचकले. विरोधी पक्षात असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना पोलिसांनी कशी काय नियमात सूट दिली, अशी चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात बराच काळ रंगली होती.
लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेले उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते यांची वाहने जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या १०० मीटर दूर अडविली जात आहेत़ पोलिसांनी पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ एक बॅरिकेड्स लावले आहे. याच ठिकाणी सर्व नेत्यांच्या गाड्या थांबविल्या जात आहेत.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर महाराज यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, शिवसेनेच्या आमदार नीलम गोºहे वाहने घेऊन आले होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांची वाहने बॅरिकेड्सजवळ थांबविली. हे नेते चालत निवडणूक कार्यालयाजवळ आले.
मात्र सोमवारी माढ्यातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर यांची गाडी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सोडण्यात आली होती. शरद पवार आणि माझी भेट झाली. मी पवारांकडून माझ्यासाठी शुभेच्छा घेतल्या. मी केवळ अर्ज दाखल केला आहे, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले.
पवारांनी पाळला प्रोटोकॉल
- शरद पवार आणि संजय शिंदे निवडणूक कार्यालयात आले तेव्हा सहकारमंत्री सुभाष देशमुख निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे अर्ज दाखल करीत होते. देशमुख आत आहेत, असे सांगितल्यानंतर पवारांनी आत जाण्यास नकार दिला. त्यांचा उमेदवारी अर्ज भरुन होऊ द्या, त्यानंतर आपण जाऊ, असे म्हणत ते कार्यालयाबाहेरील खुर्चीवर बसले. बाहेर आल्यानंतर सुभाष देशमुखांनी शरद पवार यांना नमस्कार केला. यानंतर पवार आत गेले.