सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार २८९३ कारखानदारांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 10:37 AM2020-03-06T10:37:43+5:302020-03-06T10:39:00+5:30
औद्योगिक व वाणिज्यिक ग्राहकांना दणका; महावितरणची २९ दिवसात मोठी कारवाई, वीजचोरांवर कारवाई
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदार २८९३ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून, ८०२४ थकबाकीदारांनी ३ कोटी ३५ लाख रुपयांच्या वीज बिलांचा भरणा केल्याची माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी दिली.
महावितरणकडून सद्यस्थितीत घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम वेगात सुरु आहे. यामध्ये प्रामुख्याने मोठ्या रकमेचे थकबाकीदार असणाºया वाणिज्यिक व औद्योगिक थकबाकीदारांविरुद्ध ही कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. चालू व थकीत वीज बिलांचा भरणा करण्यासाठी अधिकृत वीज बिल भरणा केंद्र, ई-वॉलेटची सोय उपलब्ध आहे. तसेच चालू व थकीत वीज बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी आॅनलाईन तसेच मोबाईल अॅपद्वारे आॅनलाईन सोय उपलब्ध आहे.
वीज बिलांच्या थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी संपूर्ण थकीत रकमेचा त्वरित भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. महावितरणकडून मीटर रीडिंगचे वाचन दरमहा ठराविक दिवशी व एसएमएसद्वारे पूर्वमाहिती देऊन केले जात आहे. यासोबतच वीज बिलांची रक्कम, वापरलेले युनिट, वीज बिल भरण्याची मुदत आदींच्या माहितीसह वीज बिलांचा भरणा करण्यासाठी स्मरण देणारा संदेश एसएमएसद्वारे ग्राहकांना पाठविला जात आहे. वीज बिल भरण्याची मुदत उलटून गेल्यानंतर नियमाप्रमाणे नोटीसदेखील एसएमएसद्वारे दिली जात असल्याचे महावितरणने सांगितले़ यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारी व कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता मोठया संख्येने उपस्थित होते़
जिल्ह्यात झालेल्या कारवाईवर एक नजऱ
- गेल्या महिनाभरात सोलापूर जिल्ह्यातील अकलूज विभागात थकबाकीदार असलेल्या वाणिज्यिक व औद्योगिक १११२ ग्राहकांनी ३६ लाख ५ हजार रुपयांचा भरणा केला तर २३ लाख रुपयांच्या थकबाकीमुळे ४८१ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. बार्शी विभागात २५५२ थकबाकीदारांनी १ कोटी १० लाख रुपयांचा भरणा केला तर ५० लाख ९२ रुपयांची थकबाकी असलेल्या ६७३ ग्राहकांची वीज खंडित करण्यात आली. पंढरपूर विभागात १३३१ थकबाकीदारांनी ४७ लाख ९ हजार रुपयांचा भरणा केला तर २२ लाख रुपयांच्या थकबाकीदार ४१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. सोलापूर शहर व ग्रामीण या दोन विभागात ३०२९ थकबाकीदारांनी १ कोटी ४० लाख रुपयांचा भरणा केला तर ८८ लाख १३ हजारांची थकबाकी असलेल्या १३२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
अनधिकृतपणे विजेचा वापर केल्यास होणार गुन्हा
- तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचेही अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी सांगितले़
सोलापूर जिल्ह्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांची वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे़ थकबाकीदार ग्राहकांनी वेळेवर वीज बिल भरून महावितरण प्रशासनास सहकार्य करावे़
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर.