आधी कोरोनावर मात केली आता रुग्णांची भीती घालवण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:22 AM2021-05-12T04:22:32+5:302021-05-12T04:22:32+5:30
मंदा गायकवाड २५ वर्षांपासून नर्सिंगचे काम करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा केल्यानंतर गेल्यावर्षांपासून त्या टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य ...
मंदा गायकवाड २५ वर्षांपासून नर्सिंगचे काम करीत आहेत. सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी सेवा केल्यानंतर गेल्यावर्षांपासून त्या टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहेत. गतवर्षी ऑगस्टमध्ये त्यांना कोरोना संसर्ग झाला होता. १७ दिवसांचे आयसोलेशन झाल्यानंतर त्या पुन्हा सेवेत रुजू झाल्या. तेव्हापासून त्या आजतागायत एकही दिवस घरी न थांबता सेवा बजावत आहेत.
दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी येणारा संबंध, लसीकरण, टेस्टिंग याबाबत बोलताना मंदा गायकवाड म्हणाल्या की, पहिल्यांदा थोडी भीती वाटत होती. घरात भावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे. इतरही कुटुंबातील व्यक्ती आहेत. आपल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून काळजी वाटत होती. परंतु आता भीती मेली आहे. तरीही आम्ही नेहमीच दक्ष असतो. वेळोवेळी हात धुणे, सॅनिटाइझ करणे, मास्क वापरणे या गोष्टी आम्ही कटाक्षाने पाळतो. घरी गेल्यानंतरही आंघोळ करणे व कपडे बदलणे या गोष्टी नियमित करतो. त्यामुळे भीती कमी झाली आहे. स्वतःची काळजी घेऊन आम्ही रुग्णांना सेवा देत आहोत. हा आमच्या दैनंदिन कामाचा भाग आहे. मंदा गायकवाड यांना त्यांनी कुटुंब नियोजनात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल खात्यांतर्गत पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.
----
न भीता लसीकरणाचे दोन डोस घेऊन सुरक्षित व्हावे. तसेच मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. वेळोवेळी हात धुवावेत. गरज नसताना घराबाहेर पडू नये. कोरोना प्रोटोकॉलचे पालन करून स्वतःसह इतरांचे जीवन सुरक्षित करावे.
-मंदा गायकवाड, आरोग्य साहाय्यक
----