गोकुळ परिवाराने अडचणींवर मात करीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:26 AM2021-09-06T04:26:21+5:302021-09-06T04:26:21+5:30
जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने ...
जपली उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा
लोकमत न्यूज नेटवर्क
सोलापूर : अनेक अडचणींचा सामना करीत धोत्री येथील गोकुळ शुगरच्या व्यवस्थापनाने गतवर्षी गाळप केलेल्या शेतकऱ्यांच्या उसाला एफआरपीपेक्षा जादा दर देऊन आतापर्यंतच्या उच्चांकी दराची परंपरा कायम राखली आहे. कारखान्याने प्रतिटन २१११ रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शुक्रवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांच्या आकस्मिक निधनाने परिवारासह शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट होते. गतवर्षीच्या गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या रकमा मिळाल्या नव्हत्या, तर ऊसतोडणी यंत्रणा आणि मजुरांची बिले थकली होती. यापूर्वी गोकुळ शुगरने प्रतिटन २६१० रुपये दर दिला होता. त्यावेळी संपूर्ण जिल्ह्यातील तो उच्चांकी दर होता. गतवर्षीच्या हंगामासाठी या कारखान्याला २०१८ रुपये एफआरपी निश्चित करण्यात आला. मात्र, कारखान्याने त्याहीपेक्षा जादा दर देण्याचा निर्णय घेतला. २१११ रुपयांप्रमाणे ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली असल्याची माहिती चेअरमन दत्तात्रय शिंदे, संस्थापक बलभीम शिंदे यांनी दिली.
आगामी गळीत हंगामासाठी ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना बिलाची रक्कम दर दहा दिवसांनी अदा करण्यात येणार आहे. प्रतिदिन ४,५०० मे. टन गाळप क्षमता असून, १८ मेगावॅटचा सहवीजनिर्मिती प्रकल्प आहे. याच गळीत हंगामापासून आसवनी डिस्टिलरी प्रकल्पाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचेही एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कपिल शिंदे यांनी सांगितले.
आगामी गळीत हंगामासाठी १०,५०० हेक्टर उसाची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, तुळजापूर, बार्शी, मोहोळ आणि अक्कलकोट या सहा तालुक्यांच्या कार्यक्षेत्रात उसाची नोंदणी सुरू असल्याचे चेअरमन दत्तात्रय शिंदे यांनी केले आहे. यावेळी संचालक विशाल शिंदे उपस्थित होते.
----
अडचणीच्या काळात शेतकऱ्यांनी खूप सहकार्य केले आहे. तुमच्या परिवाराची दयनीय स्थिती असताना वित्तीय संस्था, सहकाऱ्यांनी सहकार्य केले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळेच सावरू शकलो.
- दत्तात्रय शिंदे, चेअरमन, गोकुळ शुगर