ईएसआय, वाडियामध्येही ऑक्सिजन बेडची सुविधा; फिजिशियन नियुक्तीचा निर्णय नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 12:57 PM2021-04-06T12:57:39+5:302021-04-06T12:57:44+5:30
फिजिशियन नियुक्तीचा निर्णय नाही : सहा महिन्यांपूर्वी मंजूर कामांवर आता कार्यवाही
सोलापूर : कोरोना वाढल्यानंतर महापालिकेने होटगी रोडवरील ईएसआय हॉस्पिटल, वाडिया हॉस्पिटलमध्ये प्रत्येकी ७० ऑक्सिजन बेडची सुविधा करण्यात येत आहे. प्रशासनाने केवळ बेड वाढविण्याचा विचार केला आहे. फिजिशियनचा नियुक्तीचा विषय मात्र अद्याप मनावर घेतला नसल्याचे दिसून येते.
मागील वर्षी सुरुवातीच्या काळात कोरोनाचा सामना करण्यात महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेची दमछाक झाली. पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी हिंगलाजमाता बॉईज आरोग्य केंद्रामध्ये ७० ऑक्सिजन बेडची सुविधा केली. यामुळे अनेक सर्वसामान्य सोलापूरकरांची सोय झाली. याच काळात ईएसआयमध्ये ५० ऑक्सिजन बेड लावण्याचे काम मंजूर झाले होते; परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला म्हणून हे काम बाजूला ठेवण्यात आले. महापालिकेच्या सभागृहातही यावर चर्चा झाली नाही. आता कोरोना वाढल्यानंतर ईएसआयमध्ये ७० बेड आणि वाडियामध्ये ७० बेडची सुविधा करण्याचा निर्णय झाला आहे. ईएसआयचे काम अंतिम टप्प्यात आहे. वाडियाची अवस्था वाईट आहे. त्यामुळे येथील कामाला विलंब लागणार आहे.
---
नगरसेवकांनी काय केले?
गेल्या सहा महिन्यांत झालेल्या महापलिकेच्या सभांमध्ये केवळ टेंडर, टक्केवारी, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे, एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करण्याचे काम झाले. आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण करण्याच्या विषयावर एकाही नगरसेवकाने आवाज उठविला नाही. आताही केवळ आपल्या मर्जीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची कामे लागू नयेत यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. चांगल्या डॉक्टरांची नियुक्ती, बेडची सुविधा याबद्दलही अनेक नगरसेवक आग्रही नाहीत.
---
...तर रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही
मनपाच्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर प्राथमिक टप्प्यावरील उपचार होतात. रुग्णाची प्रकृती बिघडली तर त्याला सिव्हिल हॉस्पिटल किंवा खासगी रुग्णालयातच घेऊन जावे लागते. बॉईज आरोग्य केंद्रात आता अत्याधुनिक सुविधा आहेत. पालिकेने दोन फिजिशयन नेमले तर रुग्णांना इतरत्र जावे लागणार नाही; परंतु, महापौर, आयुक्तांनी हा विषयच मनावर घेतला नसल्याचे आरोग्य विभागातील लोक सांगतात.
मनपाच्या रुग्णालयातही तज्ज्ञ डॉक्टर असायला हवेत. आयुक्तांकडे याबद्दल आग्रह धरणार आहे. बेड न मिळाल्यामुळे कोणावरही संकट येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
- श्रीकांचना यन्नम, महापौर.